शेतीमध्ये दिवसेंदिवस नवेनवे तंत्रज्ञान येत आहे. नव्या युगातील नव्या डिजीटल तंत्रज्ञानामुळे शेतीतील मनुष्यबळ आणि खर्च कमी होताना दिसत आहे. त्याचबरोबर शेती सोपीही होत आहे. शेतीसाठी ट्रॅक्टरचलित विविध यंत्रे, फवारणीसाठी ड्रोन, लागवडीसाठी यंत्रे, पाणी देण्यासाठी सिंचनाच्या विविध पद्धती दिवसेंदिवस विकसित होत आहेत.
हवामान बदल हा शेतकऱ्यांसमोरचा सध्याच्या काळातील आव्हानात्मक घटक आहे. त्यावरही शेतकऱ्यांनी पॉलिहाऊस, ग्रीनहाऊस आणि शेडनेटचा उपाय शोधून काढला आहे. पण हवामानाचा अंदाज शेतकऱ्यांना आधीच कळण्यासाठी वेदर स्टेशनसुद्धा बाजारात आलेले आहेत. अनेक शेतकरी हे वेदर स्टेशन शेतात बसवून घेत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतातील व्यवस्थापन करण्यास मदत होते आणि हवामानाचा अंदाजसुद्धा कळतो.
वेदर स्टेशनची वैशिष्ट्ये
या वेदर स्टेशनच्या माध्यमातून पाणी नियोजन, खत नियोजन, रोग किडींचा अंदाज, फवारणीची वेळ आणि फवारणीचा अंदाज कळू शकतो. यामध्ये जमिनीच्या खाली तीन सेन्सॉर आहेत. दोन जमिनीमधील ओलाव्यासाठी आणि एक जमिनीतील तापमान मोजण्यासाठी आहे. यावरून शेताला पाणी कधी व किती द्यायचे आहे यासंदर्भातील माहिती कळते.
त्याचबरोबर वेदर स्टेशनच्या माध्यमातून हवेचा दाब, हवेतील आर्द्रता आणि तापमान, सुर्यप्रकाश, वाऱ्याची दिशा, वाऱ्याचा वेग, पानांतील ओलावा या सर्व गोष्टी समजतात. त्याचबरोबर फळबागातील किंवा शेतपिकांतील पाणी व खत नियोजन करण्यासाठी वेगळे तंत्रज्ञान वेदर स्टेशनमध्ये शेतकऱ्यांना मिळते.
दरम्यान, भविष्यात शेतीमध्ये विविध तंत्रज्ञान येत असल्यामुळे वेदर स्टेशन हे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आणि महत्त्वाचे आहे. अनेक शेतकरी या तंत्रज्ञानाचा वापर करत असून त्यांना त्याचे चांगले परिणाम दिसत आहेत. शेतकऱ्यांना हवामान बदलावर मात करण्यासाठी आणि मनुष्यबळ वाचवण्यासाठी अशा यंत्राचा वापर केला पाहिजे.