पालघर/बोर्डी : जिल्ह्यात अधूनमधून जोरदार पाऊस पडत असला तरी १२ ते १५ जुलैदरम्यान मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने १ जुलै रोजी वर्तविला होता.
त्यानुसार पुढील तीन दिवस वाऱ्याच्या गतीत वाढ होऊन १५ ते २० किलोमीटर प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी आपली जनावरे आणि लागवडीकडे लक्ष पुरवावे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्रातर्फे करण्यात आले आहे.
महावेधच्या आकडेवारीनुसार पालघर जिल्ह्यात १ जून ते ११ जुलैपर्यंत सरासरी पाऊस ७३३.० मिमी झाला आहे, तर यावर्षी जून महिन्यात ६६०.७ मिमी (९०.१ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. ११ जुलैपर्यंत जव्हार ५२३.२ (६३.६ टक्के) व मोखाडा ४५८.३ (६८.२ टक्के) तालुक्यात सर्वांत कमी पाऊस झाला आहे.
इतर तालुक्यांपैकी वसई (७८२.६) वाडा (७१३.१), डहाणू (५९६.६), पालघर (७००.५), विक्रमगड (६९७.१), तलासरी (५३८.१) मिमी पाऊस झाल्याची माहिती कृषी विज्ञान केंद्र, जिल्हा कृषी हवामान केंद्र, कोसबाड हिल येथील कृषी हवामान शास्त्रज्ञ रिझवाना सय्यद यांनी दिली.
मुसळधार पावसासोबत जोरदार वाऱ्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी नवीन लागवड केलेली फळांची झाडे तुटून पडू नयेत म्हणून नवीन झाडांना काठीचा आधार देऊन बांधावे. तसेच भात लागवड झाली असल्यास भात शेतातील अतिरिक्त साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी खोल चर करून घ्यावेत.
जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी औषध फवारणी व खते देण्याची कामे पुढे ढकलावीत, असे कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना सल्ला देण्यात आला आहे. शेतकऱ्याने त्याची अंमलबजावणी करावी, असे कृषी विभागाने म्हटले आहे.