मराठवाड्यासह विदर्भात २७, २८ व २९ डिसेंबरदरम्यान काही भागात पावसाने हजेरी लावली. गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता.
सोमवारपासून (दि. ३०) थंडीचा जोर वाढण्याचाही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तर रविवारी (दि. २९) विभागातील काही तुरळक ठिकाणी पाऊस झाला. अन्य बहुतांश भागांत स्थिर हवामान होते.
आता कमाल तापमान कमी-अधिक होत आहे. मराठवाड्यात चार दिवसांपासून ढगाळ वातावरणाचा अनुभव आला. सोमवारपासून कमाल व किमान तापमानात घट होईल. तसेच थंडीचा जोर वाढेल.
गेल्या दोन ते तीन दिवसात विभागातील काही भागात पावसाने हजेरी लावली. जानेवारी महिन्यात थंडीचा कडाका अनुभवायला मिळेल, असे हवामान तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.
पश्चिमी वाऱ्यामुळेच मागील आठवड्यात वातावरण बदलले होते. सध्या वातावरण निवळलेले असले तरी थंडीचा जोर वाढणे शक्य असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या उत्तर भारतातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरू आहे.
नवीन वर्षात पहिल्या आठवड्याच्या अखेरीस उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याम वाऱ्यामुळे मराठवाडा व विदर्भातील काही भागात पाऊस येण्याची शक्यता हवामान तज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी वर्तविली.
पाऊस आल्यास काय?
जानेवारी महिन्यात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे विभागात अवकाळी पाऊस झाल्यास रब्बी हंगामातील हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.