Weather update :
धाराशिव : नोव्हेंबर महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात कमाल तापमानाचा पारा कमी झाला आहे. दोन दिवसांपासून दक्षिण ईशान्येकडून नैऋत्याकडे वाऱ्याचा वेग वाढला आहे.
यामुळे किमान १७ अंशावरील तापमानाचा पारा १३ अंशावर आले आहे. तर कमाल ३२ अंशावरील तापमान २७ अंशावर आले आहे.
एक आठवड्यापूर्वीच्या तुलनेत किमान ४, तर कमाल ५ अंशाने तापमान कमी झाले आहे. जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पेरण्या १९ नोव्हेंबरपर्यंत ५५ टक्क्यांवर झाल्या आहेत. उर्वरित पेरण्यांचे काम जोमात सुरू आहे. काही भागातील पेरणीचे पीक चांगले दिसत आहे.
दोन दिवसांपासून वातावरणातील हवेचा वेग वाढला असून, थंडीची झुळूक येत आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्यातील किमान तापमान १३ ते १४ अंशावर, तर कमाल तापमान २७ ते २९ अंशावर स्थिरावले आहे. यामुळे थंडीचे प्रमाण काही प्रामणात वाढले आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात किमान तापमान १७, तर कमाल ३२ अंशावर होते. दोन दिवसांपासून गारठा वाढला असून, थंडीचे प्रमाण वाढले आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
यंदा रब्बी हंगामातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. थंडी वाढत असल्याने रब्बी हंगामाला पोषक वातावरण निर्माण होत आहे. मात्र, दोन दिवसांपासून अधूनमधून धुके पडत आहे. यामुळे हरभऱ्यावर अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. काही भागातील शेतकरी हरभऱ्यावर घाट अळीचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून कीटकनाशकाची फवारणी करत आहेत. अतिवृष्टीमुळे बहुतांश शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला होता. ही तूट भरून काढण्यासाठी शेतकरी धडपड करत आहेत.
४ दिवसांत आणखी वाढणार थंडी
आठ दिवसांपूर्वी जिल्ह्यातील कमाल तापमानाचा पारा ३२ अंश सेल्सिअस होते. मात्र, दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून, वाऱ्याचा वेग काही प्रमाणात वाढला आहे. यामुळे थंडावा वाढला असून, किमान तापमान ४ व कमाल तापमान ५ अंशाने कमी झाले आहे. आगामी चार दिवसांनंतर पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
वातावरणातील बदलामुळे थंडीचे प्रमाण कमी अधिक होत आहे. याचा आरोग्यावर परिणाम होतो. सध्या हवेतील वेग वाढल्याने दोन दिवसांपासून थंडी वाढली आहे. आगामी काही दिवसांत थंडी आणखी वाढेल, असे हवामान विभागाने कळविले आहे.
तापमानाची आकडेवारी
तारीख | किमान | कमाल |
१६ नोव्हेंबर | १७ | ३२ |
१७ नोव्हेंबर | १६.१ | ३१ |
१८ नोव्हेंबर | १४.५ | २९.७ |
१९ नोव्हेंबर | १४ | २९ |
२० नोव्हेंबर | १३.१ | २७ |