सिमला : शुक्रवारी रात्री उशिरा येथे झालेल्या ढगफुटीनंतर अजूनही मुसळधार पाउस सुरू असून १३२ रस्ते मार्ग बंद झाल्याने वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे. दरम्यान, सततच्या पावसामुळे किन्नोर आणि चंबा भागातही दरडी कोसळल्याने काही मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.
उत्तर व पूर्व भारताच्या काही भागांत सध्या मुसळधार पाऊस सुरू असून ओडिशातही ३० जिल्ह्यांत सध्या पूरस्थिती आहे. स्थानिक प्रशासनाने या सर्व जिल्ह्यांत दक्षतेचे आदेश दिले असून मच्छिमारांना सावधगिरीचा इशारा दिला आहे.
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसामुळे यमुना नदीला पूर आला असून त्यामुळे लगतच्या गावांना स्थानिक प्रशासनाने सतर्कतेचे आदेश दिले आहेत.
हिमाचलमध्ये ५१ घटनांत ३१ मृत्यू हिमाचल प्रदेशात यंदाच्या पावसाळ्यात गेल्या २७ जून ते १६ ऑगस्ट या ५१ दिवसांच्या काळात ढगफुटी व अचानक आलेल्या पुरामुळे ५१ घटनांत ३१ जणांचा मृत्यू झाला.
तर, दरडी कोसळल्याच्या ३३ घटनांत तिघांचा मृत्यू झाला आहे. ३३ लोक अजूनही बेपत्ता असल्याचे राज्य आपत्ती निवारण केंद्राच्या सूत्रांनी म्हटले आहे.
१९ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा• हवामान खात्याने रविवारी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थानसह १९ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा दिला असून त्यात प. बंगालमध्ये पावसाचा जोर अधिक राहील, असे नमूद करण्यात आले आहे.• मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने २२ ऑगस्टपर्यंतच्या व्यक्त केलेल्या अंदाजानुसार कोकण भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल.• पश्चिम व मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.