Weather Update : यंदाच्या हिवाळ्याबद्दल हवामान खात्याने मोठी अपडेट दिली आहे. हिवाळ्यात डिसेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत देशातील बहुतांश भागात किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, यंदा सामान्य थंडीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यंदा देशभरात थंडीचे दिवस कमी राहू शकतील तसेच कडक्याची थंडी पडणार नाही, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर या हंगामात किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यतासुध्दा वर्तविण्यात आली आहे.
असे हवामान या पूर्वी देशात १९०१ नंतर या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सर्वाधिक तापमान राहिले. या महिन्यात सरासरी कमाल तापमान २९.३७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले, जे हंगामातील सरासरी २८.७५ अंश सेल्सिअसपेक्षा ०.६२३ अंशांनी अधिक तापमान होते.
भारतीय हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिवाळ्यात (डिसेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५) या दरम्यान देशातील बहुतांश भागात किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. हिवाळ्यातील काही मोजके दिवस सोडले तर तुलनेने थंडीचे दिवस कमी राहण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
महापात्रा यांनी पुढे सांगितले की, दक्षिण द्वीपकल्पीय भारताचा बहुतेक भाग वगळता या हंगामात देशातील बहुतेक भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
साधारणपणे डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान पाच ते सहा दिवस थंडीची लाट राहण्याची शक्यता आहे. यंदा थंडीची लाट ही सरासरीपेक्षा दोन ते चार दिवस कमी राहण्याची शक्यता आहे. पश्चिमी विक्षोभ हे नोव्हेंबर महिन्यात उष्ण तापमान असल्याचे प्रमुख करण असल्याचे त्यांनी सांगितले.
फेंगल चक्रीवादळाचा तामिळनाडुला फटका
फेंगल चक्रीवादळामुळे तामिळनाडू व पुद्दुचेरीमध्ये पुर स्थिती निर्माण झाली आहे. तामिळनाडूतील धर्मापुरी व कृष्णागिरी जिल्ह्यांतील पश्चिमेकडील जिल्हे पुराच्या विळख्यात सापडले आहेत. कृष्णागिरीला गेल्या दोन ते तीन दशकांत अभूतपूर्व पूर आला आहे. तामिळनाडूतील विल्लुपुरम जिल्ह्याला मोठ्या पुराचा सामना करावा लागत आहे.
विल्लुपुरममधून जाणाऱ्या सर्व रेल्वे सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आल्याने शेकडो प्रवाशांना त्याचा फटका बसला. सुरक्षेच्या नियमांचे पालन करून परिस्थिती सुधारल्यास सेवा पुन्हा सुरू करण्याचे संकेत रेल्वे अधिकाऱ्यांनी दिले आहेत. प्रमुख्याने चेन्नई-तिरुचिरापल्ली राष्ट्रीय महामार्गावरील विल्लुपुरम आणि आसपासच्या वाहतुकीवरही परिणाम झाला.