तापमानाचा पारा आता चांगलाच वर जात असून, पुण्यातील किमान तापमान सोमवारी १८.९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे, तर कमाल तापमान ३८.९ अंशांवर आहे सकाळपासूनच उन्हाचा कडाका जाणवू लागला आहे.
येत्या चार-पाच दिवसांमध्ये राज्यात आणखी २-३ अंश सेल्सिअस तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान अकोल्यात ४१ अंश सेल्सिअस, तर सर्वांत किमान तापमान नगरला १३.७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
गेल्या आठवड्यापासून पुणे शहरातील किमान तापमान आणि कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे पुणेकरांना उष्णतेच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. दुपारी दुचाकीवरून जाताना चांगलाच चटका जाणवत आहे.
रात्रीच्या किमान तापमानातही वाढ झाली आहे. त्यामुळे रात्रीदेखील गरम हवा त्रासदायक ठरत आहे. दोन दिवसांत २ अंशाने कमाल तापमान वाढल्याचे दिसून येत आहे. शनिवारी ३७ अंशांवर तापमान होते ते आता ३९ वर पोहोचले आहे.
दरम्यान, पुढील ४-५ दिवसांत महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये कमाल तापमानात २-३ अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होईल. २६- २७ मार्च दरम्यान कोकणातील काही भागांमध्ये उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. पुढील २४ तासांत महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहणार आहे.
अहमदनगर येथे १३.७ अंश सेल्सिअस हे सर्वांत कमी आहे. मार्च महिन्याचा उत्तरार्ध तापू लागला असून मंबईसह लगतच्या बहुतांशी शहरांचे कमाल तापमान ३५ अंशावर जाऊन ठेपले आहे. ठाणे, नवी मुंबईही ३६ ते ३८ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत असून, आता यात भर म्हणून पुढील दोन दिवस कोकण आणखी तापणार आहे.
मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील चार ते पाच दिवस राज्याच्या अंतर्गत भागात कमाल तापमानात २ ते ३ अंशानी वाढ होईल. २६ ते २७ मार्च दरम्यान कोकणातील काही भागात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.
राज्यातील प्रमुख शहरांचे कमाल व किमान तापमान
शहर | कमाल तापमान | किमान तापमान |
पुणे | ३८.९ | १८.९ |
जळगाव | ३९.३ | २१.६ |
मालेगाव | ४०.८ | १९.८ |
सातारा | ३८.४ | २१.५ |
सोलापूर | ४०.६ | २६.५ |
मुंबई | ३१.० | २३.८ |
परभणी | ४०.० | २३.९ |
अकोला | ४१.० | २३.२ |
अमरावती | ४०.८ | २२.९ |
वर्धा | ४०.८ | २३.२ |
यवतमाळ | ४०.२ | २२.५ |