पुणे : मान्सूनने गुरुवारी देशातील आणखी काही भागांमध्ये प्रगती केली आहे. त्यामध्ये संपूर्ण गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेशचा भाग व्यापला आहे. तसेच राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहारचा काही भाग व्यापला. येत्या दोन दिवसांमध्ये उर्वरित भागात मान्सून मजल मारेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
पुढील चार दिवस राज्याच्या विविध भागांमध्ये हलक्या ते मध्यम सरी कोसळतील, असा अंदाजही दिला आहे. हवामान विभागाने गुरुवारी कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.
यात मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे, संपूर्ण विदर्भ आणि खान्देश, तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
शुक्रवारी (दि. २८) कोकण, पुणे, सातारा, विदर्भातील अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा आणि भंडारा जिल्ह्यात ठिकठिकाणी हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.
तसेच राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळतील. पुढील तीन दिवस पावसाचा जोर कोकण आणि विदर्भामध्ये वाढणार आहे. दरम्यान मान्सूनने देशाच्या बहुतांश भागात मजल मारली आहे.
मध्य महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांत रविवारपर्यंत (३० जून) मध्यम पावसाची शक्यता कायम आहे. खान्देशातील नंदुरबार, धुळे, जळगाव या तीन जिल्ह्यांत गुरुवारपासून आठवडाभर म्हणजे ४ जुलैपर्यंत अरबी समुद्र शाखीय म्हणजे डांग जिल्ह्याच्या घळीतून येणाऱ्या डांगी पावसाची जोरदार शक्यता आहे. नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या सहा जिल्ह्यांत रविवारपर्यंत वर्तविलेली मध्यम पावसाचीच शक्यताही तशीच आहे. - माणिकराव खुळे, सेवानिवृत्त हवामानतज्ज्ञ