पुणे : अरबी समुद्रात, तसेच बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील चार ते पाच दिवस कोकण, विदर्भात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुढील दोन दिवस काही ठिकाणी पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. मात्र, ६ सप्टेंबरदरम्यान आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असल्याने राज्यात पाऊस वाढण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुढील दोन दिवस काही ठिकाणी पावसाची शक्यता असून, जळगाव, नगर, नाशिक पुणे व सातारा या जिल्ह्यांमध्ये चार ते पाच दिवस मेघ गर्जना व विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.
मराठवाड्यातही हीच स्थिती असेल, यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रविवारी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुणे शहरात पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.
३ सप्टेंबर रोजी ठळक ठिकाणी घाट परिसरात खूप जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दक्षिण गुजरात किनारपट्टी ते केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे.
परिणामी, राज्यात पुढील चार ते पाच दिवस बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकण व गोव्यात, तसेच विदर्भात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रात तयार झालेल्या या चक्रीवादळाची दिशा पश्चिम दक्षिण पश्चिम असल्याने राज्यात जोरदार पावसाची शक्यता कमी आहे. मात्र, गणेशोत्सवाच्या सुरुवातीला, अर्थात ६ सप्टेंबर रोजी आणखी एका कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. त्यामुळे सहा ते नऊ सप्टेंबर यादरम्यान राज्यात पाऊस वाढेल. उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर राहील. - डॉ. अनुपम काश्यपी, माजी विभागप्रमुख, हवामानशास्त्र विभाग