पुणे: यंदा देशभरात १०६ टक्के पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. जून महिना संपला असून, आतापर्यंत देशभरात २०१.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. देशात सरासरी २०४.९ मिमी पाऊस होतो. सरासरीपेक्षा १.८१ टक्के पाऊस कमी झाला असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
हवामान विभागाने यंदा चांगला पाऊस होईल, असा अंदाज दिला होता. परंतु, अद्यापतरी अनेक ठिकाणी पावसाचे प्रमाण खूप कमी आहे. काही भागामध्ये मात्र सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे.
महाराष्ट्रामध्ये दुष्काळी भागात म्हणजे लातूर, बीड, परभणी, बारामती, दौंड, इंदापूर या ठिकाणी जून महिन्यात चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. परंतु, विदर्भातील नंदुरबार, गडचिरोली व इतर जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस झाला आहे. तसेच मुंबई विभागातही पावसाचे प्रमाण कमी आहे.
जून व जुलै महिन्यामध्ये पावसाचा खंड पडेल आणि ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात त्याची कसर भरून निघेल, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी दिला होता. आतापर्यंत तर जून महिना संपला तरी बहुतांश भागातील पावसाची सरासरी अर्धीच आहे. आता जुलै महिन्यात चांगला पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
जुलै महिन्यामध्ये चांगला पाऊस होऊ शकतो. आतापर्यंत पावसाने देशातील सरासरी गाठलेली आहे. हळूहळू का होईना पावसाचे प्रमाण चांगले होऊ शकते. आता मान्सूनमध्ये ऊर्जा नसल्याने जोरदार किवा मुसळधार पडत नव्हता. येत्या काही दिवसांमध्ये मान्सून दमदार बरसेल, अशी शक्यता आहे. - डॉ. अनुपम कश्यपी, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ, पुणे