पुणे : गेल्या काही दिवसांपासून ढगांची गर्दी दिसून येत आहे. परंतु, पाऊस जोरदार पडत नाही. केवळ रिमझिम पाऊस पडत आहे. आताचा मान्सून हा ऊर्जा नसलेला आहे. त्यामध्ये बळकटी नाही.
त्यामुळे अशा प्रकारची स्थिती आहे. पण आता मान्सूनला बळकटी येत असून, येत्या तीन-चार दिवसांत चांगला पाऊस पडेल, असा अंदाज सेवानिवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविला आहे. मान्सूनचा पाऊस होण्यासाठी त्यात ऊर्जा असणे आवश्यक आहे. खुळे म्हणाले, मान्सूनमध्ये बळकटी दिसत नव्हती.
ऊर्जा नव्हती. त्यामुळे केवळ ढग दिसत होते. पण आता २ जुलैपासून मान्सून बळकट होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ६ ते ९ जुलैदरम्यान पुण्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे, असे खुळे यांनी सांगितले.
विशिष्ट भागातच पाऊस का पडतो?
- एखाद्या गावात, शहरात काही विशिष्ट भागात पडणारा पाऊस म्हणजे, वातावरणातील संवहनी क्रियेद्वारे पडणारा पाऊस होय.
- येथे तेथील भौगोलिक रचना महत्त्वाची असते. त्या भागावर पडणारी सूर्याची उष्णता हा महत्त्वाचा घटक असतो.
- सूर्याच्या उष्णतेने जमिनीचा पृष्ठभाग तापतो. जमिनीने शोषलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होते. ते बाष्प वर जाऊन ऊबदार, अशा दमट पाण्याच्या वाफेत रूपांतरित होते आणि ते वर गेल्यावर उंचावरील थंडाव्यातून, पाण्याच्या वाफेचे सांद्रीभवन होऊन फक्त त्या मर्यादित क्षेत्रातच पाऊस पडतो. त्याला स्थानिक परिस्थिती जबाबदार ठरते.
राज्यात पाऊस होईल का?
राज्यात चांगला पाऊस होईल, असे वातावरण आहे. मुंबईचे सात जिल्हे आणि विदर्भातील जिल्हे येथे पाऊस आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात कमी पाऊस आहे. मध्य महाराष्ट्रात आता दोन- तीन दिवसांत पाऊस होणार आहे. मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. १० जुलैपासून पुन्हा वातावरणात बदल होणार आहे