Maharashtra Latest Weather Updates : राज्यातील मागील महिन्यात चांगला पाऊस पडल्याने शेतकरी सुखावला आहे. तर यंदाच्या मान्सून हंगामात आत्तापर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. येणाऱ्या काळात कोकण आणि पश्चिम घाटमाथ्यावर कमी आणि विदर्भ आणि पूर्वेकडील राज्यात जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, स्वातंत्र्यदिनाच्या दिवसापासून राज्यातील पावसाची स्थिती विचारात घेतली तर राज्यात कुठेच जोरदार पावसाचा किंवा मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला नसल्याने पावासाच जोर कमी झाल्याचे स्पष्ट आहे. तर येणाऱ्या पाच दिवसांत म्हणजे १९ ऑगस्ट पर्यंत विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय.
त्याचबरोबर महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे असलेल्या कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. तर यातील काही दिवस रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्चवली आहे. पण मागच्या एका आठवड्यापूर्वी कोकण, पश्चिम घाट, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात जेवढा पाऊस सुरू होता त्या तुलनेत पाऊस कमी झाला आहे.
पुढील १८ व १९ ऑगस्ट रोजी पूर्ण विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर १६ व १७ ऑगस्ट रोजी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिणेकडील जिल्ह्यांत काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मागील दोन महिन्याचा विचार केला तर पश्चिम घाट आणि कोकणात पावसाचे प्रमाण जास्त होते. पण आत्ता कोकणात व पश्चिम घाट परिसरातील पाऊस कमी होऊन तो पूर्वेकडे सरकला आहे असे चित्र आहे.