राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यानंतर आता तापमानात काहीशी घट झाली आहे. प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
पुढील पाच दिवसात कमाल व किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. दिनांक ८ ते १४ मार्च दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढीलप्रमाणे कृषी सल्ल्याची शिफारस केली आहे.
वेळेत पेरणी झालेल्या पिकांची करा मळणी
- वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या हरभरा, गहू व रब्बी ज्वारी पिकाची काढणी व मळणी करून घ्यावी.
- मळणी केलेला माल उन्हात वाळवून साठवणूक करावी.
- कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, उशीरा पेरणी केलेलया गहू पिकास दाणे भरताना (पेरणीनंतर 90 ते 95 दिवस) पाणी द्यावे.
गव्हाच्या पिकात उंदराचा प्रादुर्भाव झालाय?
गव्हाच्या पिकात उंदरांचा प्रादुर्भाव दिसून असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी झिंक फॉस्फाईड 1 भाग + गुळ 1 भाग + 50 भाग गव्हाचा भरडा व थोडसे गोडतेल मिसळून हे मिश्रण उंदराच्या बिळात टाकुन बिळे बंद करावीत.
अंतरमशागतीची कामे घ्या करून..
कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे वेळेवर पेरणी केलेल्या उन्हाळी भुईमूग पिकात आवश्यकतेनूसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी व्यवस्थापन करावे. भुईमूग पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.
फळबागेचे व्यवस्थापन
कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, केळी व आंबा बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या द्राक्ष घडांची काढणी करून घ्यावी.
भाजीपाला
भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.
फुलशेती
काढणीस तयार असलेल्या गुलाब फुलांची काढणी कडून बाजार पेठेत पाठवावी. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.
पशुधन व्यवस्थापन
आपल्या पशुंना उन्हामध्ये बांधु नका (निदान तिव्र उन्हाच्या कालावधीमध्ये त्यांना झाडाखाली/सावलीमध्ये किंवा शेड/गोठ्यामध्येच बांधणे चांगले). पशुंना शक्यतो थंड/स्वच्छ/मुबलक पाणी दोन-तिन वेळेस पाजावे.
पाण्यामुळे पशुंच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी (डीहायड्रोजन) होणार नाही. जमल्यास पाण्यामधून क्षार द्यावेत, 5 लिटर पाण्यामध्ये चिमुटभर गुळ (25 ग्रॅम), थोडे मिठ (5-10 ग्रॅम) आणि 5 ग्रॅम क्षार मिश्रण दिल्यास उत्तम, मात्र नजीकच्या पशुवैद्यकाचा सल्ला घेऊनच व्यवस्थापन करावे.