Join us

पश्चिम महाराष्ट्राचे पुराचे पाणी आता मराठवाड्याला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2024 10:22 AM

२३०० कोटी जागतिक बँक देणार

कोल्हापूर, सांगली भागातील पूर व्यवस्थापन करणे आणि पावसाळ्यात ते पाणी दुष्काळी मराठवाड्यात देणे, या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला वित्तसाह्य करण्यास जागतिक बँकेने मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला मोठा दिलासा देणारा ठरणार आहे.

या प्रकल्पात जागतिक बँक २३२८ कोटी रुपये, तर राज्य सरकार ९९८ कोटी रुपये असे योगदान असेल. महाराष्ट्रात एकीकडे तीव्र दुष्काळ, तर दुसरीकडे अतिवृष्टी अशी परिस्थिती निर्माण होते. हवामान बदलाबाबत व्यापक दृष्टिकोनातून विचार करण्याची हीच वेळ आहे. अनेक जागतिक संस्थांच्या गाठीशी आपत्ती व्यवस्थापनाचा उत्तम अनुभव असतो. अशावेळी पुराच्या भागातील पाणी दुष्काळी भागात वळवून एकाच वेळी दोन्ही क्षेत्रांना आपण दिलासा देऊ शकतो, अशी भूमिका उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सातत्याने मांडली होती. त्यातून महाराष्ट्र वातावरणपूरक विकास कार्यक्रमाची आखणी झाली.

पूर व्यवस्थापन प्रकल्पास मंजुरी

■ आता या पूर व्यवस्थापन प्रकल्पाच्या माध्यमातून कृष्णा आणि भीमा नदी खोयांत प्रगत तंत्रज्ञानातून कामे होतील

■  पूररेषा आखणे, नदी खोलीकरण, गाळ काढणे अशी अनेक कामे होणार आहेत.

■ एकीकृत जलव्यवस्थापन आणि देखरेख प्रणालीतून अतिरिक्त पाणी दुष्काळी भागात वळविणे शक्य होणार आहे.

जागतिक बँकेच्या चमूने केली होती पाहणी

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जागतिक बैंक, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहेत. १२ सप्टेंबर २०१९ रोजी जागतिक बँकेच्या चमूने पूरग्रस्त भागाची पाहणी करुन लगेचच फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली होती.

टॅग्स :पूरपाणीमराठवाडा