Lokmat Agro >हवामान > अलनिनो वर्षात काय काय झाले हवामानात बदल?

अलनिनो वर्षात काय काय झाले हवामानात बदल?

What happened to the climate change during El Nino year? | अलनिनो वर्षात काय काय झाले हवामानात बदल?

अलनिनो वर्षात काय काय झाले हवामानात बदल?

' एल-निनो वर्षात थंडीची साथ व रब्बी हंगामावर मात '

' एल-निनो वर्षात थंडीची साथ व रब्बी हंगामावर मात '

शेअर :

Join us
Join usNext

देशात २०२३ वर्ष अवकाळी पाऊस, थंडी, उष्णतेच्या तीव्र झळा अशा अनेक वातावरणीय घटना  दसून आल्या. अल निनोचा प्रभाव प्रभावीपणे दिसून आला. खरीप हंगामासह रब्बी हंगाम सुरु होताना काय काय वातावरणीय घटना घडल्या‌?  त्याचा शेतीवर काय परिणाम झाला? याविषयी जेष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळेय यांनी नोंदवलेली निरिक्षणे.. जाणून घ्या..

शेती हंगाम सुरू होण्यापूर्वीची एप्रिल-मे मधील अवस्था 

ह्या वर्षी २०२३ चा सरासरीइतक्या दिर्घकालीन पावसाचा अंदाज असतांनाही आयओडी धन अवस्थेत असूनही त्याची साथ न मिळाल्यामुळे, एल-निनोमुळे जून ते सप्टेंबरच्या पावसाळी हंगामातील चार महिन्यात सरासरीच्या खालच्या पातळीतील कमी पाऊस झाला. जून व ऑगस्ट ह्या दोन महिन्यात तर खुपच कमी पाऊस झाला. कमी तर झालाच पण तोही असमान वितरणातच झाला. म्हणून तर खरीपाबरोबर पुढे येणाऱ्या रब्बी हंगामासाठी टंचाईसदृश्य स्थिति जाणवू लागली होती.

‘एल-निनो’मुळे  घडून आलेल्या वातावरणीय घटना -
        
‘एल-निनो’ मुळे त्याच्या गुणधर्म व दाखवलेल्या अपेक्षित परिणामानुसार, एकुणात २०२३-२४ च्या,ह्या वर्षी खालील वातावरणीय घटना दिसून आल्यात. 
             
संपूर्ण देशात काय झाले ?

• उष्णता टिकून राहिली.
• अपुरा व टंचाई युक्त पाऊस झाला. 
             
नेमके उत्तर भारतात काय झाले?

• पश्चिमी झंजावाताची तीव्रताही सामान्यच राहिली.
• थंडीच्या लाटाही कमीच राहिल्या. 
• बर्फबारी कमी झाली.
• पश्चिमी झंजावाताची वारंवारता जरी टिकून राहिली, पण तीव्रता कमीच राहिली.
• पश्चिमी झंजावातांनी प्रमाणातच आर्द्रता वाहून आणली.  
• आर्टिक व सैबेरिअन थंड कोरडे वारे अधिक दक्षिणेकडील समशितोष्ण कटिबंधावरील अक्षवृत्तवर सरकले नाहीत.
• धुक्याचे प्रमाण अधिक राहिले. 
 
महाराष्ट्रात काय परिणाम जाणवले?

• हवेत कधीच अतिरिक्त दमटपणा चढलाच नाही. 
• अति टोकाची थंडी आपण अनुभवली नाही
• ढगाळ वातावरण नसल्यामुळे पडणाऱ्या थंडीला अटकाव झाला नाही.
• सकाळच्या वेळी दवीकरण अल्पच घडून आले.
• पहाटेचे किमान तापमानात चढ-उतार जाणवलेत. 
• दुपारचे कमाल तापमानही हे सरासरी कमाल तापमानापेक्षा नेहमीच कमी राहिले.
• पहाटेचे किमान तापमान माफक पण कमाल तापमानही कमीच राहिल्यामुळे दिवसाही  थंडी जाणवतच राहिली.

एल निनो मुळे त्याच्या गुणधर्मनुसार संपूर्ण हंगामात ह्या वर्षी उष्णता टिकून राहिली. ह्या उष्णतेमुळेच ह्यावर्षी जरी आर्द्रता वाढवली गेली असली तरी अपुऱ्या व टंचाई युक्त पावसामुळे जमिनीची पाण्याची भूक भागली नाही. जमीन तहानलेलीच राहिली. त्यामुळे जमिनीतला अपुरा ओलावा व त्याचबरोबर एल-निनोमुळे मर्यादित राहिलेले पहाटेचे  किमान तापमान  ह्यातून हवेत कधीच अतिरिक्त दमटपणा ह्यावर्षी संपूर्ण हंगामात चढलाच नाही.  म्हणून तर अपाय करणारे दवीकरणही अल्पच घडून आले. शेतपिके दवीकरणा पासून होणाऱ्या अपायापासून अबाधितच राहिले, ही एकप्रकारे शेतपिकांना व फळबागांना मदतच झाली.

३-उत्तर भारतात ऑक्टोबर २०२३ पासूनचे पश्चिमी झंजावाताचे वर्तन व महाराष्ट्रावर थंडीचाही परिणाम एल-निनो वर्षात पश्चिमी झंजावाताची वारंवारता जरी टिकून राहिली पण त्यांची तीव्रताही अपेक्षेप्रमाणे सामान्यच होती. उत्तर भारतात थंडीच्या लाटाही कमीच जाणवणार होत्या तश्या त्या जाणवल्या. अति टोकाची थंडी आपण अनुभवली नाही. बर्फबारी कमी झाली.

एल-निनो मुळे मध्यम तीव्रतेत मार्गक्रमण करणारे पश्चिमी झंजावातांनी प्रमाणातच आर्द्रता वाहून आणली. एल-निनो मुळेच आर्टिक व सैबेरिअन थंड कोरडे वारे दक्षिणेकडील समशितोष्ण कटिबंधावरील अक्षवृत्तावर येऊन पश्चिमी झंजावातांनी आणलेल्या आर्द्रतेत मिसळण्याची प्रक्रिया घडून आली नाही. परिणामी  गिलगिट बाल्टीस्थान जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडसहित संपूर्ण उत्तर भारतात अपुऱ्या थंडीमुळे धुक्याचे प्रमाण अधिक राहिले तर खुपच कमी प्रमाणातच पाऊस व बर्फबारी झाली.  जी झाली ती माफकच झाली. म्हणून तर हिवाळ्यात महाराष्ट्रात अतिटोकाची थंडी जाणवली नाही. परिणामी महाराष्ट्राने बेताची पण सातत्यपूर्ण थंडी अनुभवली.  

४-खरीपानंतर २०२३ च्या ऑक्टोबर महिन्यात रब्बी हंगाम सुरू होण्यापूर्वीची अवस्था
पाऊस टंचाईच्या पार्श्वभूमीवर ओढग्रस्त सिंचन कमतरतेत गेलेल्या २०२३ चा खरीप हंगामानंतर लगेचच येणाऱ्या रब्बी हंगामाबाबत शेतकरी अधिक चिंतित व भयभित झालेले होते. काय अवस्था असू शकते रब्बी हंगामाची, अशी विचारणा होवु लागली. कारण एल-निनो अधिकच तीव्र होणार होता, अश्या बातम्या येऊ लागल्या होत्या. पण एल-निनोमुळेच शेतपिकांना थंडी मिळणार आणि रब्बी हंगाम जिंकता येईल, असा भाकीत वजा त्यावेळी दिलेला दिलासा देण्यात आला. तो कसा जिंकता येईल, त्याची कारणे व स्पष्टीकरणेही त्यावेळी दिली गेली.
 
५-प्रत्यक्षात घडून आले 
नोव्हेंबर २०२३ ला सुरु होणाऱ्या व मार्च २०२४ ला सांगता होणाऱ्या यंदाच्या रब्बी हंगामापूर्वीच वातावरणावर आधारित केलेल्या वातावरणीय घडामोडीच्या तार्कीक भाकीतानुसार, 'एल-निनो’ वर्षातील  यंदाचा रब्बी हंगाम जिंकून देणारी मध्यम का होईना पण पूरक थंडीमुळे शक्य होईल, ही वाणी एकदम खरी ठरली. म्हणजे खरं तर "'एल-निनो"नेच थंडीद्वारे रब्बी हंगामाची घडी बसवली, असेच आपण आज म्हणू या! कारण एल निनोमुळेच मिळालेल्या थंडीमुळे रब्बी हंगाम जिंकता आला, असे म्हणता येईल. 'एल निनो' म्हणून थंडी मिळणार! हेच रब्बी हंगाम जिंकण्याचे त्या वेळच्या विश्लेषणाचे तार्कीक उत्तर व सूत्र होते. आणि तेच घडून आले, हेच आज आपण पाहत आहोत.    

 ६-‘एल-निनो च्या २०२३-२४ वर्षात एकूणच थंडीचे वर्तन
एल-निनो वर्षातील हिवाळ्यात पहाटेचे किमान तापमानात चढ-उतार जाणवलेत. पण दिवसातील दुपारचे कमाल तापमानही हे सरासरी कमाल तापमानापेक्षा नेहमीच कमी राहिले. खरेतर ही एक वेगळीच वातावरणीय घटना ह्या वर्षीच्या एल-निनो वर्षात पाहवयास मिळाली. त्यामुळे संपूर्ण हिवाळ्यात दिवसाही थंडी जाणवतच राहिली. आणि अजूनही ती जाणवत आहे. 

७-फक्त चालू फेब्रुवारी २०२४ च्या महिन्यात जाणवणारी थंडी व दिवसाचा ऊबदारपणाबाबतचा अंदाज
ह्यावर्षीच्या  २०२४ फेब्रुवारी महिन्यासाठीच्या मासिक अंदाजानुसार, संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान हे सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यतेमुळे ह्या चालु फेब्रुवारी महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात थंडीचे प्रमाणही दरवर्षीच्या सरासरी थंडीपेक्षा कमीच जाणवेल, असे वाटते. दिवसाच्या उबदारपणाबाबत बोलावायचे झाल्यास, कोकण व उत्तर महाराष्ट्रातील १२ जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यात दुपारचे कमाल तापमान ह्या महिन्यातील सरासरी तापमानाइतके म्हणजे दिवसाचा ऊबदारपणा तेथे नेहमीसारखाच जाणवेल. परंतु  वर स्पष्टीत कोकणातील ७ व उत्तर महाराष्ट्रातील खांदेश, नाशिक, छत्रपती संभाजीनगर अशा एकूण १२ जिल्ह्यात मात्र ह्या महिन्यात उबदारपणा सरासरीपेक्षा अधिकच  जाणवेल. सहसा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या सुरवातीच्या दोन ते तीन आठवडयात थंडी जाणवते, तर शेवटच्या आठवडयाच्या आसपास मात्र थंडी कमी होत जाते. परंतु ह्यावर्षीच्या २०२४ च्या फेब्रुवारी महिन्याच्या चालु पहिल्या आठवडयात मात्र ह्या आठवड्याच्या सुरवातीला महाराष्ट्रात काहींशी थंडी जाणवेल तर आठवड्याच्या शेवटी थंडी कमी जाणवेल, असे वाटते. थंडीच्या लाटेची शक्यता मात्र ही संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रात जाणवणार नाही. 

८-चालू फेब्रुवारी २०२४ च्या महिन्याबाबतचा पावसाचा खुलासा  
फेब्रुवारी महिन्यात पावसाची मासिक सरासरी ही अगदी नगण्यचं असते. तरी देखील ह्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्याच्या मासिक अंदाजानुसार ह्या महिन्यात पावसासंबंधी भाष्य करतांना, असे बोलता येईल की, महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सोलापूर, कोल्हापूर असे ७ जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता दर्शवते. परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ ह्या ५  जिल्ह्यात तर ही शक्यता अधिक जाणवते. कोकणातील वर स्पष्टीत ७ जिल्ह्यात मात्र ही शक्यता सरासरीपेक्षा खुपच कमी म्हणजे फेब्रुवारी महिन्यात पावसाची शक्यता नाहीच, असे समजावे. 

९-महाराष्ट्रातील चालू २०२३-२४ रब्बी हंगामातील शेतपिकांवर वातावरणाचा घडून आलेला परिणामाचे केलेले निरीक्षण 
ह्या वर्षी रब्बी चालू रब्बी हंगामात, एल-निनो मुळे, थंडी विशेष जाणवली नाही, दवीकरण नाही, ढगाळ वातावरण नाही, दमटपणा नाही, ह्या सर्वांच्या अभावामुळेव व ह्यांच्या एकत्रित परिणामामुळे चालु वर्षाच्या रब्बी पिकांवर निर्माण झालेल्या पाणी टंचाईतही, रब्बी पिके जगवण्यासाठी एल - निनो वर्षात वातावरणाने शेतकऱ्यांना खालील पध्दतीने मदतच केली, असे वाटते.

• चालु वर्षाच्या रब्बी पिकांवर मावा, बुरशी, किडीचा प्रादुर्भाव विशेष असा झाला नाही. 
• अतिपावसाच्या अभावामुळे शेतपिकातील तणांना फोफावण्यास अटकाव झाला. तणे फोफावू शकली नाहीत.
• तणनाशके, बुरशीनाशकांच्या किडनाशकांच्या अति फवारण्या टळल्या गेल्या. आणि फवारले गेलेले द्रवरूपातले पोषके पिकांना लागू पडलेत. 
• टाकलेल्या खतात तणांनी भागीदारी न केल्यामुळे खते पिकांना पूर्णपणे लागू पडलीत. त्यामुळे शेतपिके तजेलेदार राहिलीत.
• शेतपिकांना लागणारी सिंचनाच्या आवर्तनाची वारंवारता मर्यादितच राहून पाण्यासाठीची टोकाची ओढ निर्माण झाली नाही.
• शेतपिके दवीकरणाच्या अपायापासून अबाधितच राहिले
             
त्यामुळे भले कमी असु दे, पण  ढगाळ वातावरण नसल्यामुळे पडणाऱ्या थंडीला अटकाव झाला नाही. दरवर्षी जशी घालवली जाते तशी पूर्णपणे थंडी  एल-निनो मुळे ह्या वर्षी घालवली गेली नाही. त्यामुळे माफक असू दे पण सतत थंडी पिकांना मिळत गेली. निरभ्र आकाशामुळे प्रकाशसंश्लेषण कालावधीही वाढला गेला. त्यामुळे पिके पोसण्यात अडचण जाणवली नाही. सर्व वातावरणीय घडामोडी पिकांना हितकारक ठरु लागल्यात. अतिरिक्त पाऊस न झाल्यामुळे जे काही पाणी पिकांना उपलब्ध झाले, तेव्हढे मिळालेले  पाणी पुरेसे ठरले. हवे तेव्हढेच गरजेइतकेच  मिळालेल्या माफक पाण्याच्या सिंचनातून ह्या वर्षीच्या पिकांचा रब्बी हंगाम सहज जिंकता येत आहे. 
         
अश्यापध्दतीने रब्बी पिकांना केवळ एल-निनो व त्याने नियंत्रित केलेल्या थंडीमुळे न दिसणारा व लक्षात न येणारा फायदा झाला, असेच समजावे. म्हणून तर रब्बी हंगामापूर्वी 'एल-नीनोंच्या वर्षातही जर तर च्या अटीवर थंडीमुळे रब्बी हंगाम जिंकता येईल ' असे केलेले तार्कीक भाकीत सत्यात उतरले असेच म्हणावे लागेल. हवामान शास्त्रीय विश्लेषनाच्या नजरेतून पाहिल्यास तार्कीक भाकीत व प्रत्यक्षात घटना सत्यात उतरणे ह्याचा ताळा नक्कीच जमला, असे आज म्हणता येईल.

Web Title: What happened to the climate change during El Nino year?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.