राज्यात सध्या उष्णता कमालीची वाढली असून आज जळगावात ४७.८ अंश तापमानाची नोंद झाली. बहुतांश महाराष्ट्रात तापमान ४० अंशाहून अधिक झाले आहे. सध्या एवढी उष्णता का वाढली आहे? यामागील नेमक कारण जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी स्पष्ट केले आहे.
मार्च ते मे हा ३ महिन्याचा मान्सूनपूर्व हंगाम महाराष्ट्रासाठी भौगोलिक रचनेनुसार वातावरणात एकाकी खुप बदल घडवून आणतो. कोकण किनारपट्टीला समुद्राचा खारा वारा कोकणपट्टीतील अधिवासासाठी दररोज आदळतो. दिवसा व रात्री वाऱ्याची दिशा वेगळी असते. ह्याच दरम्यान पाकिस्तान अफगाणिस्तान व राजस्थान च्या भागातून उच्च दाबाची प्रणाली झाली तर वायव्य दिशेकडून गुजराथ, अरबी समुद्रावरून वारे, उष्णता व आर्द्रता घेऊन मुंबईसह संपूर्ण कोकणात सह्याद्रीवर अडकून आदळतात व जबरदस्त उष्णतेची जबरदस्त लाट मुंबईसह कोकणात महाराष्ट्राच्या इतर भागापेक्षा जाणवते.
पूर्व मोसमी (मार्च ते मे ) हंगामात जेंव्हा दोन प्रति -चक्री वादळे, अथवा प्रति-विवर्ते (अँटीसायक्लोन) किंवा उच्च हवेच्या दाबाचे डोंगर एक अरबी समुद्रात तर दुसरे बंगालच्या उप सागरात किंवा किनारपट्टीच्या भू भागावर तयार होतात तेंव्हा ह्या दोघांच्या मधे वाऱ्याची विसंगती (विंड डिसकंटीनुईटी ) तयार होते. म्हणजेच वारे एकमेकांच्या विरुद्ध महाराष्ट्रात तसेच देशाच्या मध्यावर वाहू लागतात. अरबी समुद्राच्या बाजूला उत्तरेकडून दक्षिणेकडे तर बं. उ. सागरबाजूला दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहतात. ह्या दोघांमध्ये जी निर्वात पोकळी तयार होते तिलाच ' वारा खंडितता (विंड डिसकंटीनुईटी ) म्हणतात.
सिझननुसार घडणाऱ्या प्रणल्यांनुसारच देशात पूर्व-मोसमी( मार्च, एप्रिल, मे असे ३ महिने )ह्या सिझन मधील ' वारा खंडितता ' ही प्रणाली सुद्धा ठळक वैशिष्ठ्याची असते. आणि ह्या प्रणल्यालीमुळे देशात १५ ते २० डिग्री अक्षवृत्त दरम्यान उच्चं दाब क्षेत्रे तयार होतात. व काही कालावधी नंतर ते विरळही होत असतात.
महाराष्ट्रात उष्णता वाढलेली आहे....
आज ही वारा खंडितता प्रणालीमुळे समुद्रसपाटी पासून ९०० मीटर उंचीपर्यन्त हवेच्या कमी दाबाचा आस हा दक्षिण कर्नाटक ते पूर्व विदर्भापर्यन्त पसरला असुन ह्याची रुंदीही काही किलोमीटरमध्ये असुन त्यामुळे तेथे वारा शांत असतो. हवेच्या दाबाच्या रेषाचे व वारा दिशांचे जोड क्षेत्र तयार झालेले आहे. त्यामुळे ह्या क्षेत्रात आर्द्रतायुक्त उष्ण हवा लोटली आहे. सौराष्ट्र व कच्छ, उत्तर कर्नाटकात तसेच नैरूक्त राजस्थानात उष्णतेच्या लाट सदृश्य स्थिती जाणवत आहे. म्हणून या पाच दिवसात महाराष्ट्रात अति नसली तरी उष्णता वाढलेली आहे.
लेखक : जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे