राज्यभरातून मान्सूनची माघार झाली आहे. मुळातच पावसाची उशीराने झालेली सुरुवात, त्यानंतर साधाराण दीड महिन्याचा खंड, खंडानंतर मान्सूनची सक्रीयता असा यंदाचा साधारण मान्सूनचा आलेख असताना छत्रपती संभाजीनगर विभागात या दशकभरात सरासरी पर्जन्यमान किती होते?
तब्बल पाच वर्ष दुष्काळ. पावसाची तूट . आटलेल्या विहिरी, तलाव, धरणे यामुळे पाण्यासाठी वाट पाहण्याची वेळ मराठवाड्यात वारंवार आलेली दिसते. कधी दुष्काळामुळे तर कधी अति पावसामुळे शेतकऱ्याचे नुकसान ठरलेले. मागील दशकभरात औरंगाबाद विभागात झालेल्या पावसाचा चढता उतरता आलेख मागील दोन वर्षांच्या पावसाने वाढला होता. मात्र यंदा पुन्हा पावसाची तूट आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागात यावर्षी झालेले सरासरी पर्जन्यमान ७५१ मिमी एवढे झाले असून प्रत्यक्ष झालेला पाऊस ९१४.६ मिमी एवढा होता. म्हणजेच यंदा १२२% पावसाची नोंद झाली. यावर्षी झालेले पर्जन्यमान मागील दोन वर्षांच्या पावसाच्या मानाने कमी नोंदवले गेले. मागील दहा वर्षांमध्ये २०१२, २०१४, २०१५,२०१८, २०१९ पाच वर्ष दुष्काळाचे त्यानंतर दोन वर्षे चांगल्या पर्जन्यमानानंतर यंदा पुन्हा पाऊस घटला आहे.
दहा वर्षात विभागात कोणत्या वर्षी किती पाऊस पडला?
२०१२ ते २०१९ वर्षी छत्रपती संभाजीनगर विभागात सरासरी पर्जन्यमान ७७९ मिमी अपेक्षित होते.मात्र, या काळात प्रत्यक्षात पडलेल्या पावसात मोठी तफावत होती.२०१४ व २०१५ ही वर्षे दहा वर्षातील सर्वात कमी पावसाची ठरली. २०१४ ला ५३ टक्के तर २०१५ ला ५६ टक्के पावसाची नोंद झाली. त्यानंतर २०१९ या वर्षी पुन्हा पावसात तूट होती. यावर्षी केवळ ९९ टक्के पावसाची नोंद झाली.
वर्ष | सरासरी पाऊस मिमी | प्रत्यक्ष झालेला पाऊस मिमी | टक्केवारी % |
२०१२ | ७७९ | ५३८.२८ | ६९ |
२०१३ | ७७९ | ८५४.३७ | ११० |
२०१४ | ७७९ | ४१४.०३ | ५३ |
२०१५ | ७७९ | ४३३.६४ | ५६ |
२०१६ | ७७९ | ८७९ | ११३ |
२०१७ | ७७९ | ६७३.०८ | ८६ |
२०१८ | ७७९ | ५०१.७४ | ६४ |
२०१९ | ७७९ | ७७०.६७ | ९९ |
२०२० | ७५१ | ९५१.०५ | १२७ |
२०२१ | ७५१ | १०९७.८८ | १४६ |
२०२२ | ७५१ | ९१४.६ | १२२ |