Join us

जायकवाडीत पिण्यासाठी वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा, काय आहे स्थिती?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 2:15 PM

पैठण येथील जायकवाडी धरणातील सध्याची पाण्याची स्थिती..

मराठवाड्याला येणाऱ्या काळात दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी पाऊस कमी झाल्याने पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्नही निर्माण होणार असून, टैंकर लॉबी पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे आहेत.

नाथसागरात वरच्या धरणातून हक्काचे पाणी आणताना न्यायालयीन लढा लढावा लागला आहे. आठ टीएमसी पाणी वरच्या धरणातून सोडण्यात आले; मात्र, जायकवाडी धरणात केवळ ५.६२ टीएमसी पाणी प्रत्यक्षात पोहोचले. मंगळवारी नाथसागर धरणाची पाणीपातळी ४३.७७ टक्के एवढी होती. हे पाणी सध्याच्या वापरानुसार वर्षभर पुरेल असा अंदाज आहे.

गतवर्षी डिसेंबर महिन्यात ही पाणीपातळी ९३ टक्क्यांवर होती. यंदा मात्र पाणीसाठा अर्ध्यापेक्षा कमी आहे. मागील वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे नाथसागर धरणाचे २७ दरवाजे अनेक वेळेस उघडून गोदापात्रात जवळजवळ २०९ टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. मात्र, यावर्षी धरणाची परिस्थिती बिकट आहे. यंदा धरणाने पन्नाशीही गाठली नाही. नाथसागरातून अनेक एमआयडीसी, डीएमआयसीसह विविध शहरांना पाणीपुरवठा केला जातो. नाथसागर धरणातून दररोज ०.२९ दलघमी पाण्याचा उपसा होत असतो. तसेच सिंचनासाठी उजवा कालवा व डावा कालवा यामधून दोन पाणी पाळ्या आणखी शेतकऱ्यांना दिल्या जाणार आहेत. डाव्या कालव्यातून २५ दिवस पाणी सोडले जाईल. तर उजव्या कालव्यातून पंधरा दिवस पाणी सोडले जाईल, असे धरण अभियंता विजय काकडे यांनी सांगितले.

धरणाची परिस्थिती बिकट

• आज रोजी पाणीपातळी ४३ टक्के आहे. वरच्या धरणातून केवळ ५.६२ टीएमसीच पाणी आले. ५० टक्क्यांच्या खाली पाणीसाठा होण्याची ही चौथी वेळ असून, यापूर्वी २०१२, २०१४, २०१८ ला अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

• धरणातील पाणीसाठा हा वर्षभर पिण्यासाठी पुरेल एवढाच उपलब्ध आहे. दोन पाणी पाळीनंतर सिंचनासाठी पाणी धरणातून दिले जाणार नाही. भविष्यात उद्योगाचा पाणीपुरवठाही कपात केला जाऊ शकतो.

 

टॅग्स :जायकवाडी धरणधरणपाणीपाणीकपात