Join us

रब्बी पेरण्यांच्या सुरुवातीला कसे असेल तापमान?

By मुक्ता सरदेशमुख | Published: October 23, 2023 3:02 PM

पुढील सात दिवस तापमानात काय होणार बदल?

राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये रब्बी पीक पेरणीला सुरुवात झाली असून काही ठिकाणी रब्बीपूर्व तयारीला वेग आला आहे. दसऱ्यानंतर मराठवाड्यात खऱ्या अर्थाने पीक पेरण्यांना सुरुवात होईल. दरम्यान, रब्बी पेरण्यांच्या सुरुवातीला मराठवाड्यात तापमान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला असून जमिनीतला ओलावा कमी झाला आहे. चक्रीवादळ व वातावरणाच्या बदलांमुळे मराठवाड्याच्या तापमानात १ ते २ अंशाने घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच कमाल व किमान तापमान येत्या काळात सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

पुढील सात दिवस हवामान कोरडे

मराठवाड्यात पुढील सात दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता, काढणीस तयार झालेल्या सोयाबीन पिकाची स्वच्छ हवामानात काढणी करण्याचा तसेच कापसाची वेचणी करण्याचा सल्ला कृषी हवामान केंद्राने दिला आहे. 

प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील काळात पावसाची शक्यता नसल्यामूळे शेतकऱ्यांनी खरीप पिकांची काढणी केल्यानंतर लगेच उपलब्ध जमिनीतील ओलाव्यावर लवकरात लवकर रब्बीच्या पेरणी करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

तापमान वाढले तर होईल असा परिणाम

येत्या सात दिवसात तापमान १ ते २ सेल्सियसने वाढणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ऑक्टोबर हीटमुळे रब्बी पिकांवर परिणाम होतो.  तापमान वाढीचा रब्बी पिकांवर परिणाम होत आहे. जमिनीत आर्द्रता कमी झाली आहे. वातावरणात दमटपणा आहे. समजा अद्रक पीक असेल तर त्यावर कंद सड आणि करपा रोगाचा प्रादूर्भाव होत आहे. भाजीपाल्यावर वेगळे रोग पडतात. कपाशीवर दहिया रोगाचा प्रादुर्भाव होतो. 

पिकांच्या उगवण क्षमतेवर होतोय परिणाम

"मराठवाड्यात जमिनीतील आर्दता कमी असल्याने रब्बी पिकांच्या उगवण क्षमतेवर परिणाम होताना दिसत आहे.  मातीत आर्दतेचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे पिकांचं 'जर्मिनेशन' म्हणजेच उगवण क्षमता कमी होत आहे. यंदा पाऊस कमी झाला. त्यामुळे खरीप पिकांवरही रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसून आला आहे. आता खरिप पिकांची काढणी शेतकरी करत आहेत. काढणी झाल्यानंतर जमिनीत थोडा ओलावा शिल्लक असतो. त्यामुळे आहे त्या ओलाव्यात शेतकऱ्यांनी  रब्बी पेरण्या कराव्यात." अशाेक झिरवळ, कृषी हवामान केंद्र, छत्रपती संभाजीनगर

राज्यात तापमानाची स्थिती काय?

चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मागील देान दिवसांपासून तापमानात घट झाल्याचे चित्र आहे. ढगाळ वातातवरण कायम आहे. कोकण- गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उन्हाचा चटका वाढणार आहे.

टॅग्स :रब्बीहवामानतापमानमराठवाडाखरीपशेतकरी