राज्यात थंडीचा कडाका वाढला असून तापमानाचा पारा मागील दोन दिवसात कमालीचा घसरल्याचे चित्र आहे.मागील दोन दिवसांपासून विदर्भ-मराठवाड्यावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. दरम्यान पूर्व व पश्चिम विदर्भात काल पावसाचे ठिकठिकाणी हजेरी लावली. भंडारा, गोंदिया जिल्ह्यात पावसाने रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, मराठवाडा, विदर्भात तापमानाचा पारा घसरला आहे. काल जळगाव जिल्ह्यात किमान तापमान ९.६ अंशांवर गेले होते. तर नाशिकमध्ये काल तापमान १०.१ अंश सेल्सियस झाले होते. मराठवाडा आणि विदर्भावर चक्राकार वारे घोंगावत असल्याचे भारतीय हवामान खात्याने सांगितले.
कसे राहणार मराठवाडा विदर्भात हवामान?
पुढील दोन दिवसात विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले. तर मराठवाड्यात कोरडेच हवामान राहणार असल्याचाही अंदाज देण्यात आला आहे. पुढील २४ तासांत पूर्व व पश्चिम विदर्भात पुन्हा हलक्या सरींची शक्यता आहे.
मागील दोन दिवसांपासून विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यासह एकोडी, मासळ, तुमसर, पहेला, मांगली गावांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली.
गोंदियामध्येही अवकाळीची हजेरी
गोंदिया जिल्ह्यात मध्यरात्रीपासून जोरदार पावसाने हजेरी लावली.३.७ मिमी पावसाची नोंद झाली असून रब्बी पिकांना फटका बसला आहे. रात्री झालेल्या पावसाने जिल्ह्यात गारठा वाढला होता. मोहाडी, साकोली, लाखनी गावांमध्ये तापमान घसरले होते.
राज्यात कुठे कसे होते तापमान?
पावसाच्या शक्यतेमुळे अनेक भागात काल ढगाळ वातावरण होते. दरम्यान तापमानात काही प्रमाणात घट झाली होती. हवामान विभागाचे प्रमुख के. एस होसाळीकर यांनी राज्यातील जिल्ह्यांमध्ये काय तापमान होते याची आकडेवारी नोंदवली आहे.
नांदेड १७.४, छत्रपती संभाजीनगर १२.३, रत्नागिरी १७.१, महाबळेश्वर ११.५, सातारा १२, नाशिक १०.१, हर्णै २०.२, मुंबई १४.८, अहमदनगर ११.७, डहाणू १५.३, पुणे १३.४, बारामती १२.८, जेऊर १४.५, माथेरान १५.८, जालना १७, मालेगाव ११.६, जळगाव ९.६, धाराशिव १८