Join us

जगात सर्वात जास्त थंडी असते तरी कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 2:47 PM

चीनमध्ये तुफान बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे शिनजियांग भागात थंडीने गेल्या ६४ वर्षांचा विक्रम मोडला.

चीनमध्ये तुफान बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे शिनजियांग भागात थंडीने गेल्या ६४ वर्षांचा विक्रम मोडला. या भागात उणे ५२.३ अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली. ट्युएरहाँग या फ्युयुन जिल्ह्यातील शहरात नीचांकी तापमानाचा विक्रम नोंदविण्यात आला. यापूर्वी उणे ५१.५ अंश सेल्सिअस एवढे तापमान २१ जानेवारी १९६० रोजी नोंदविण्यात आले होते. एवढे तापमान एकट्या चीनमध्येच नसते. तर त्यापेक्षाही कमी तापमान असलेली काही ठिकाणे जगात आहेत. या ठिकाणचे जीवन म्हणजे दररोजचा संघर्षच, अशा ठिकाणांबाबत जाणून घेऊ या..

क्लिन्क संशोधन केंद्र, ग्रीनलैंड: ग्रीनलँडच्या बर्फाळ प्रदेशात हे संशोधन केंद्र आहे. येथे १९७२मध्ये उणे ८९.४ एवढे आतापर्यंतचे सर्वात नीचांकी तापमान नोंदविण्यात आलेले आहे.

व्होस्टोक तळ, अंटार्क्टिका: या ठिकाणी १९८३मध्ये उणे ८९.२ अंश सेल्सिअस एवढे नीचांकी तापमान नोंदविण्यात आले होते. अंटार्क्टिकाच्या

सर्वोच्च पठारावर रशियाचे संशोधन तळ आहे.

व्हर्बोयान्स्क, रशिया : सायबेरिया हा जगातील सर्वात थंड प्रदेशांमध्ये गणला जातो. या ठिकाणी हे गाव आहे. १८९२मध्ये येथे उणे ८९.२ अंश सेल्सिअस एवढे नीचांकी तापमान नोंदविलेले आहे.

डेनली, अलास्का: उत्तर अमेरिकेतील सर्वात उंच शिखर असलेल्या डेनली येथे उणे ८३ अंश सेल्सिअस एवढे तापमान खाली येते. माउंट मॅककिनले म्हणून हा भाग ओळखला जातो.

ओडमॅकान, रशिया : सायबेरियामध्येच हे गाव आहे. आतापर्यंत येथे उणे ८८ अंश सेल्सिअस एवढे नीचांकी तापमान नोंदविण्यात आले आहे. सरासरी उणे ५० अंश तापमान या भागात असते.

नॉर्थ आइस, ग्रीनलँड : ग्रीनलँडमधील बर्फाळ प्रदेशामध्ये हे संशोधन केंद्र आहे. येथे उणे ८६.२ अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदविण्यात आले. सरासरी उणे ८० अंश सेल्सिअस एवढे तापमान येथे असते.

स्लॅग, कॅनडा : कॅनडामध्ये स्लॅग नावाचे एक छोटेसे गाव आहे. येथे उणे ६२.८ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान घसरले होते. या भागात मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होत असते.

भारतात काश्मीर, हिमाचल प्रदेश, लेह-लडाख इत्यादी भागात कडाक्याची थंडी पडते.

सियाचीन ग्लेशियर -५० अंश सेल्सिअस

द्रास-४५ अंश सेल्सिअस

लेह-लडाख-३५ अंश सेल्सिअस

लाहौल-स्पिती-३० अंश सेल्सिअस

श्रीनगर-३० अंश सेल्सिअस

टॅग्स :हवामानतापमान