Weather : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण शेतकऱ्यांसाठी चिंताजनक ठरत आहे. मागील पाच सहा दिवसांपासून ढगाळ वातावरणासह मध्यंतरी अवकाळी पावसाने हजेरी लावत शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळवले. अजूनही ढगाळ वातावरण सर्वदूर असून पुढील तीन दिवस ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुले यांनी व्यक्त केली आहे.
राज्यात पावसाने शेतकऱ्यांच्या हाता तोंडातला घास हिरावून घेतला. अनेक पीक काढणीला आली असताना अवकाळीने मात्र अनेक पिकांना अक्षरशः झोपवलं. अवकाळी पावसांनंतर देखील वातावरण जैसे थे असून अनेक भागात दाट धुक्यांसह ढगाळ हवामान अनुभवयाला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर टांगती तलवार आहे. आजही सकाळपासून ढगाळ हवामान असून वातावरण कधी निवळणार या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. याबाबत दिलासा देणारा अंदाज जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिला आहे. त्यांच्या अंदाजानुसार येत्या 5 डिसेंबरपर्यंत ढगाळ हवामानाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागणार आहे.
खुळे यांच्या हवामान अंदाजानुसार कोकण -मुंबईसह कोकणातील 7 जिल्ह्यात फक्त आजपासून पूर्णतः तेथे उघडीप व स्वच्छ सूर्यप्रकाश जाणवेल. तर मध्य महाराष्ट्र- खान्देश, नाशिकसह सोलापूर पर्यंतच्या 10 जिल्ह्यात आज ढगाळ वातावरणसहीत तूरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. परंतु परवा रविवार 3 डिसेंबरपासून या जिल्ह्यांत पूर्णतः उघडीप व स्वच्छ सूर्यप्रकाश जाणवेल. तसेच मराठवाडा - मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात आज 1 तसेच 4, 5 डिसेंबर (शुक्रवार, सोमवार, मंगळवार) असे तीन दिवस फक्त ढगाळ वातावरणसहीत तूरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. बुधवार 6 डिसेंबरपासून पासून पूर्णतः उघडीप व स्वच्छ सूर्यप्रकाश जाणवेल.
वादळाचा परिणाम जाणवणार नाही...
तसेच विदर्भातील 11 जिल्ह्यात मात्र आजपासून पुढील 3 दिवस म्हणजे मंगळवार दि.5 डिसेंबरपर्यंत ढगाळ वातावरणसहीत तूरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. तेथेही बुधवार 6 डिसेंबरपासून पूर्णतः उघडीपव स्वच्छ सूर्यप्रकाश जाणवेल. सोमवार 4 डिसेंबरला तामिळनाडू व आंध्रप्रदेश किनारपट्टी सीमावर्ती भागात आदळणारे ' मिचोंगं ' नावाचे सौम्य चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र या वादळाचा महाराष्ट्रावर कोणताही विशेष वातावरणीय परिणाम जाणवणार नसल्याचे देखील खुळे यांनी स्पष्ट केले आहे.