Join us

कुठे होणार गारपीट आणि वादळी पाऊस? असा आहे राज्यातील हवामान अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 7:05 PM

काल उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. तर आज व उद्या (२६ व २७) ला त्याची तीव्रता कायम आहे. हवामान अंदाज, पाऊस व गारपीटीचा अंदाज कसा राहिल, ते जाणून घेऊ या.

आज उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रासह, कोकण व विदर्भाच्या अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी गारपीट झाल्याने द्राक्षासारख्या पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान  बुधवार दि.२९ नोव्हेंबरपासून मात्र हळूहळू थंडीची सुरवातीची शक्यताही जाणवत असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. तर सोमवार व मंगळवारीही राज्यात अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

सोमवार दिनांक २७ नोव्हेंबर : यलो आणि रेड अलर्टमुंबईसह कोकण किनारपट्टी, मध्य व दक्षिण महाराष्ट्राचा काही भाग, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्याचा काही भागात यलो अलर्ट आहे. तर विदर्भ व पूर्व मराठवाड्यातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. 

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात (उद्या २७ ला) पावसाची तीव्रता आहे. २६ ला गारपीट होण्याची शक्यता आहे. २७ ला काहीशी शक्यता कमी आहे.

विदर्भातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाट व गारांसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातही काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारपीट व वादळी पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे.

तर कोकण किनारपट्टीचा काही भाग आणि मराठवाड्यातील काही भागात विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

मंगळवार दिनांक २८ नोव्हेंबर : यलो अलर्टमहाराष्ट्रात यलो अलर्ट देण्यात आलेला असून विदर्भातील काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

विदर्भात( उद्या २७ ला व परवा २८ ला पावसाची तीव्रता वाढून २७ ला गारपीट होण्याची शक्यता आहे. २८ ला फक्त पाऊस आहे.

म्हणून पाऊस आणि चक्रीवादळ महाराष्ट्राला संपूर्ण हिवाळ्यात फक्त थंडी देणाऱ्या, उत्तर वायव्य भारतातील ' पश्चिमी झंजावात ', सध्या गुजरात महाराष्ट्रावरून, दक्षिणेकडे पार अरबी समुद्रपर्यंत सरकल्यामुळे, त्याच्या सहा किमी. पेक्षा अधिक उंचीवर तयार होणाऱ्या हवेच्या दाबाच्या ' आसा ' मुळे, वर उंचावरून खाली जमिनीकडे झेपवणाऱ्या थंड व कोरडे वाऱ्यांचा, व तसेच दक्षिण भारतातून हवेच्या दाबाचा तयार झालेला निम्न पातळीतील ' पूर्वी झोत आसा’तून जमिनीकडून वरच्या दिशेने (खालून वर) वाहणाऱ्या आर्द्रतायुक्त वाऱ्याच्या मिलाफातून, अशा दोन प्रणालिंच्या एकत्रित परिणामातून, नोव्हेंबरच्या या शेवटच्या आठवड्यात, सध्या हंगामातील पहिल्या थंडी ऐवजी, आपणास अनपेक्षितपणे अवकाळी पावसाची सलामी मिळत आहे.

काल उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. तर आज व उद्या (२६ व २७) ला त्याची तीव्रता कायम आहे, अशी माहिती आयएमडीचे निवृत्त हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.

नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सध्या भारतीय विषववृत्तीय सागरीय परिक्षेत्रात प्रवेशलेला ' मॅडन ज्युलीयन ऑसिलेशन ' एकपेक्षा अधिक ऍम्प्लिटुडच्या घेराने कार्यरत असल्यामुळे दक्षिण थायलंड व अंदमान व निकोबारच्या दक्षिणेकडे बंगालच्या उपसागरात ३ ते ६ किमी दरम्यान चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे उद्या सोमवार दि. २७ नोव्हेंबर रोजी कमी दाब क्षेत्र तयार होवून चक्रीवादळाची बीजे रोवण्याची शक्यता आहे. त्याची समुद्रात वायव्यकडे मार्गस्थ होण्याची शक्यता जाणवते.

त्याच्या दिशा व विकासनावरच पुढील वातावरणीय परिणाम जाणवेल. तसेच  गुरुवार दि.३० नोव्हेंबर रोजी पुन्हा एक सौम्य पश्चिमी झंजावात पश्चिम हिमालयीन क्षेत्रात आपला परिणाम दाखवण्याची शक्यता जाणवत असल्याचे निरीक्षणही श्री. खुळे यांनी वर्तविले आहे.

मराठवाड्यासाठी असा आहे अंदाजप्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हयात काही ठिकाणी, दिनांक 28 नोव्हेंबर रोजी परभणी,‍ हिंगोली व नांदेड जिल्हयात काही ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

मराठवाडयात पुढील दोन दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर कमाल तापमानात 3 ते 4 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसात किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होऊन त्यानंतर किमान तापमानात हळूहळू 3 ते 4 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 24 ते 30 नोव्हेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त तर दिनांक 01 ते 07 डिसेंबर दरम्यान पाऊस सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा किंचित जास्त, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 29 नोव्हेंबर ते 05 डिसेंबर 2023 दरम्यान कमाल तापमान मध्यमप्रमाणात सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे. सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे तर जमिनीतील ओलावा वाढलेला आहे.

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतकऱ्यांनी पिकास पाणी देणे, वर खताची मात्रा देणे, किटकनाशक फवारणे, रोगनाशक फवारणे ही कामे पुढे ढकलावी. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने ही शिफारस केली आहे.

टॅग्स :हवामानपाऊसशेतकरीगारपीट