Join us

मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे प्रमाण का वाढले? सांगतायत हवामानशास्त्रज्ञ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 10:44 AM

मान्सूनचे वर्तन बदलते आहे. पाऊस सरासरी पूर्ण करतोय, पण शेतीसाठी आवश्यक असलेला भिजवणीचा पाऊस आता पडत नाही.

पुणे : मान्सूनचे वर्तन बदलते आहे. पाऊस सरासरी पूर्ण करतोय, पण शेतीसाठी आवश्यक असलेला भिजवणीचा पाऊस आता पडत नाही. मुसळधार ते अतिमुसळधार या श्रेणीत बरसणाऱ्या पावसाचे प्रमाण वाढले असून, त्याचा शेतीसाठी उपयोग होताना दिसत नाही.

एखाद्या परिसरात कमी काळात प्रचंड पाऊस, दुसरीकडे दुष्काळी परिस्थिती, अवेळी गारपीट, उष्णतेच्या लाटा हे सर्व हवामानातील बदलांचे दृष्य परिणाम आहेत, असे प्रतिपादन भारतीय हवामान विभागाचे उपमहासंचालक आणि प्रसिद्ध हवामानशास्त्रज्ञ डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी केले.

पर्यावरण-निसर्ग या विषयात कृतिशील जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्यरत असलेल्या 'भवताल फाउंडेशन' या संस्थेतर्फे रविवारी नागरिकांसाठी शिवाजीनगर येथील हवामान वेधशाळेची क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती.

हवामान केंद्र कसे असते? पाऊस कसा मोजतात? हवामानाच्या नोंदी कशा घेतात? त्यासाठी कोणती उपकरणे वापरतात? त्यांचा हवामानाचा अंदाज देण्यासाठी कसा वापर करतात? हवेतील नोंदी कशा मिळवतात? हे नागरिकांना प्रत्यक्ष पाहता आले.

त्याचबरोबर डॉ. होसाळीकर यांच्याशी थेट संवाद साधता आला. यावेळी 'भवताल फाउंडेशन'चे संस्थापक संचालक अभिजीत घोरपडे उपस्थित होते.

ढगफुटीबाबत डॉ. होसाळीकर म्हणाले, 'ढगफुटी ही गोष्ट हिमालयासारख्या पर्वतीय प्रदेशासाठी नवी नाही. महाराष्ट्रातील डोंगराळ भागांमध्ये ढगफुटीच्या घटना घडतात. मात्र, अलिकडे शहरातही ढगफुटीसदृश्य पाऊस पडताना दिसतो.

२५-३० वर्षांपूर्वी ढगफुटी होत होती का? असा प्रश्न वारंवार विचारला जातो. कदाचित त्यावेळी अशी परिस्थिती उ‌द्भवत असेलही; मात्र, त्याकाळी पाऊस मोजण्यासाठी आजच्याएवढे प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध नसल्याने या प्रश्नाचे नेमके उत्तर देता येत नाही.

भवताल फाउंडेशन'चे संस्थापक-संचालक अभिजीत घोरपडे म्हणाले की, नागरिकांमध्ये पर्यावरण निसर्गविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी भवताल फाउंडेशन कार्यरत आहे.

पावसाच्या नोंदी घेणारा बलून• हवामान विभागातर्फे दररोज पहाटे ४:३० आणि सायंकाळी ४:३० वाजता हवामानाच्या नोंदी घेणारा बलून आकाशात सोडला जातो.• हा बलून प्रत्यक्षात आकाशात सोडताना पाहणे व त्याने घेतलेल्या नोंदी समजून घेणे, हे या क्षेत्रभेटीचे खास आकर्षण ठरले.• आकाशात सुमारे २५ ते ३० किलोमीटर उंचीवर जाऊन पावसाच्या नोंदी देणाऱ्या या बलूनची नेमकी कार्यपद्धती, यामध्ये वापरली जाणारी उपकरणे, नोंदी कशा घेतल्या जातात, हे समजून घेणे ही भवतालप्रेमींसाठी एक पर्वणी ठरली.

टॅग्स :हवामानशेतकरीशेतीपाऊसमोसमी पाऊसमोसमी पावसाचा अंदाज