गेल्या शतकात मानवी हस्तक्षेपामुळे तापमान वाढून पृथ्वीच्या ७५ टक्क्यांहून अधिक क्षेत्रात पावसाची अस्थिरता वेगाने वाढली आहे, विशेषतः ऑस्ट्रेलिया, युरोप आणि ईशान्य अमेरिकेवर हा प्रभाव अधिक आहे. त्यामुळेच अचानक वादळी पाऊस, Drought भीषण दुष्काळ, असे प्रकार अधिक वाढले आहेत, असे ताज्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
चिनी संशोधक आणि ब्रिटिश हवामान विभागाने केलेले यासंदर्भातील निष्कर्ष विज्ञान नियतकालिकात प्रकाशित झाले आहेत. हवामान बदल पावसाला अधिक अस्थिर करत आहेत आणि हा बदल आणखी वाढत जाईल, असा या शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.
शास्त्रज्ञांनुसार गेल्या १०० वर्षांमध्ये विशेषतः ऑस्ट्रेलियामध्ये पावसाची अस्थिरता अधिक वाढली आहे. चिंतेची बाब म्हणजे हवामान बदल चालू राहिल्याने ही समस्या आणखी बिकट होणार आहे. त्यामुळे दुष्काळ आणि पूर या दोन्हींचा धोका वाढतो. दैनंदिन पर्जन्यमानातील बदल जगभरात सर्व ऋतूंमध्ये आढळल्याचे संशोधकांनी अहवालात म्हटले आहे.
ग्लोबल वॉर्मिंगचा पावसावर कसा परिणाम होतो?
■ संशोधकांचे निष्कर्ष समजून घेण्यासाठी, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की, कोणते घटक वादळ किती प्रचंड प्रमाणात पाऊस निर्माण करतात आणि जागतिक हवामान बदलांमुळे (ग्लोबल वॉर्मिंग) या घटकांवर कसा परिणाम होतो.
■ पहिला घटक म्हणजे हवेत पाण्याची वाफ किती आहे. उष्ण हवेत जास्त ओलावा असू शकतो. ग्लोबल वॉर्मिंगमुळे ठराविक क्षेत्रावरील पाण्याच्या बाष्पाचे प्रमाण सरासरी सात टक्क्यांनी वाढते. शास्त्रज्ञांना या समस्येबद्दल कित्येक वर्षांपासून कल्पना आहे.
■ औद्योगिक क्रांतीपासून पृथ्वीचे तापमान १.५ अंश सेल्सिअसने वाढले आहे. त्यामुळे पाण्याची वाफ होण्याचे प्रमाण १० टक्क्यांनी वाढले आहे. त्यातून वादळी पावसाचे प्रमाण वाढले आहे.
अभ्यासात काय आढळले?
■ संशोधनात दिसून आले आहे की, १९०० च्या दशकापासून पावसाच्या अस्थिरतेत पद्धतशीर वाढ झाली आहे. जागतिक स्तरावर पर्जन्यमानातील दैनंदिन परिवर्तनशीलता दर दशकात १.२ टक्क्यांनी वाढला आहे.
■ अस्थिरता वाढणे म्हणजे कालांतराने पावसाचे वितरण अधिक असमान होत जाते. ज्यामुळे कमी वेळेत एकतर अतिवृष्टी होते किंवा अत्यंत कमी पाऊस पडतो. याचा अर्थ असा की, दिलेल्या ठिकाणी वर्षभराचा पाऊस कमी दिवसांत पडतो.