Join us

धरणातून पाणी सोडताना टीएमसी अन् सोडल्यावर क्यूसेक! असे का?

By मुक्ता सरदेशमुख | Published: January 15, 2024 3:06 PM

धरणाची पाणीक्षमता कशी मोजतात? त्याची एकके काय?

धरणातूनपाणी सोडताना टीएमसी आणि सोडल्यावर क्सूसेक! असे का? काय फरक आहे या एककांमध्ये? धरणातीलपाणीक्षमता मोजण्याची एकके कोणती? जाणून घेऊया धरणाबाबत या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे...

राज्यात सध्या वेगवेगळ्या धरणसमुहातून पाण्याची आवर्तने सोडण्यात येत आहेत. धरणातील काही टीएमसी पाणी सोडले, इतक्या क्सूसेक पाण्याचा विसर्ग होतोय अशा स्वरूपाची अनेक वाक्ये आपल्याला दिसतात. पिण्याच्या पाण्यापासून शेतीसाठी लागणाऱ्या पाण्यापर्यंत धरण हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. शेतकऱ्यांपासून सामान्य नागरिकाच्या  पाण्याची तहान भागवणाऱ्या धरणातून किती पाणी सोडले जाणार याची उत्सूकता सर्वांनाच असते. मात्र, धरणातून पाणी सोडताना टीएमसी, क्यूसेक, क्यूमेक, दलघमी या एककांमध्ये अनेकांचा गोंधळ होतो. समजून घेऊया या एककांचे अर्थ..

धरणातील पाणीक्षमता कशी मोजतात?

कोणत्याही धरणात किती लिटर पाणी बसू शकते हे ठरवणे म्हणजे त्याची क्षमता तपासणे. धरणातील पाणी मोजण्यासाठी टीएमसी, दलघमी, क्यूसेक, क्यूमेक्स इ. एककं वापरली जातात. राज्यात सध्या रब्बी पेरण्यांच्या अंनुषंगाने वेगवेगळ्या धरणसमुहांमधून पाण्याची आवर्तने सोडण्यात येत आहेत. यंदा धरणातील पाणीसाठा कमी असल्याने किती पाणी पिकांना द्यायचे, किती सिंचनाला आणि पिण्यासाठी वाटायचे यानुसार पाण्याचे नियोजन सुरु आहे. काही धरणांमधून रब्बी पिकांसाठी धरणसाठ्यातील एक ते दोन आवर्तने सोडण्यात येत आहेत. यासाठी कोणती एकके आहेत?

टीएमसी म्हणजे काय?

धरण क्षमता ठरवण्याचे एकक म्हणजे टीएमसी. म्हणजे अब्ज घनफूट. एक टीएमसी पाणी म्हणजे तब्बल २८ अब्ज ३१ कोटी ६८ लाख ४६ हजार ५९२ लिटर एवढं पाणी! (28,316,846,592). एखादं धरण ७६.६५ टीएमसी एवढ्या क्षमतेचं असेल तर हे पाणी केवढं असेल! धरणातून पाणी सोडताना साधारणत: टीएमसी हे एकक वापरले जाते.

भोजापूर धरणातून पहिल्यांदा महिनाभर आवर्तन, दुष्काळी स्थितीत जमीन भिजली!

वाहत्या पाण्याचं एकक काय?

नदीतून वाहत्या पाण्याचा वेग किंवा वाहणाऱ्या पाण्याचा वेग मोजण्यासाठी क्सुसेक व क्यूमेक ही परिमाणं वापरली जातात. क्यूसेक म्हणजे घनफूट प्रतिसेकंद. तर क्यूमेक म्हणजे घनमीटर प्रतिसेकंद. धरणाच्या दारातून किंवा बंधाऱ्यातून एका सेकंदाला किती पाणी बाहेर पडलं हे या एककावरून कळतं. शासकीय पातळीवर फूटापेक्षा मीटरशी संबंधीत असणाऱ्या क्यूमेक या एककाचा अधिक वापर होतो.

एक क्यूसेक म्हणजे किती?

एक क्यूसेक पाणी म्हणजे एका सेकंदात एक धनफूट पाण्याचा प्रवाह. या प्रमाणात एका सेकंदात २८.३ लिटर पाणी बाहेर पडते. याचप्रमाणे १ क्यूमेक पाणी म्हणजे एका सेकंदात एक घनमीटर पाण्याचा प्रवाह. म्हणजे एक क्यूमेकमध्ये एका सेकंदात १,००० लिटर पाणी बाहेर पडते. त्यामुळे धरणातून पाणी सोडताना टीएमसी आणि वाहणाऱ्या पाण्यासाठी क्यूसेक ही एककं वापरली जातात.

महाराष्ट्रातील प्रमुख धरणांमध्ये आज किती पाणीसाठा आहे?

आजच्या मकर संक्रांतीच्या दिवशी महाराष्ट्रातील प्रमुख धरणांमधील एकूण पाणीसाठा आता ५८ टक्के इतका झाला आहे. दिनांक १४ जानेवारी सकाळी ६ पर्यंतचा हा पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच काळात धरणांमध्ये ८२ टक्के पाणीसाठा होता.

मकर संक्रांतीपर्यंत राज्यातील धरणात किती पाणीसाठा? कुठल्या धरणातून पाणी सोडण्याची शक्यता

पुणे विभागात ५९.३३%, नाशिक विभागात ६२. ६ टक्के, औरंगाबाद विभागात ३४.११ टक्के, अमरावती विभागात ६७.९८ टक्के, नागपूर विभागात ६५.३४ टक्के इतका पाणीसाठा सध्या शिल्लक आहे. हा पाणीसाठा जिवंत आणि मृत असा आहे.

टॅग्स :धरणपाणीशेती