राज्यातील दक्षिण भागात सध्या येणाऱ्या अवेळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होताना दिसत आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच कोकणात पडणारा हा अवेळी पाऊस नक्की का पडतोय? हवामान विभागानेही काल या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला होता. तसेच अनेक भागात उकाडा आणि आर्दता वाढली आहे. मुंबई व परिसरात उकाडा आणि घामाच्या धारांनी नागरिक बेजार झाले आहेत. मराठवाडा विदर्भातील काही भागात हवामान कोरडे होत आहे. सध्या राज्याच्या दक्षिण भागात पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.
राज्यात का पडतोय अवेळी पाऊस?
अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ३ ते ४ दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि गोव्यात जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. अरबी समुद्राच्या अरबी समुद्राच्या पूर्व मध्य भागात चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव वाढत असून समुद्राच्या वायव्य व पूर्वमध्य भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
पुढील २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता
भूगर्भातील पाण्याचं होतंय बाष्प
मान्सूनच्या चक्रांमध्ये फार मोठे बदल होत आहेत. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा याचे चार चार महिन्यांचा कालावधींच्या सीमारेषा धूसर झाल्या आहेत. सध्या अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. समुद्राचं बाष्प महाराष्ट्रावर येत आहे. विशेषत: दक्षिण महाराष्ट्राच्या बाजूला त्याचा अधिक प्रभाव आहे. भूगर्भातील पाण्याचं आणि समुद्रातील पाण्याचं बाष्पीभवन होत असल्याने अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कोकणातील काही भागात हा पाऊस होत आहे. भूगर्भातील टॅक्टोनिक प्लेट उत्तरेला सरकत आहेत. त्याच्या घर्षणामुळे जमिनीखालच्या पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे अनेक भागात ढगाळ वातावरणासह पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. - प्रा. किरणकुमार जोहरे, हवामान अभ्यासक, नाशिक
पावसासोबत काही भागात उकाडा
एकाबाजूला दक्षीणेकडे पावसाचा अंदाज दिला गेला असला तरी मुंबई व उपनगरात वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. अनेक भागात ढगाळ वातावरण आहे. अरबी समुद्रात सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबईत उकाडा वाढला आहे. उष्णतेमुळे जमीन तापली आहे. समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे पट्टे उत्तरेकडे सरकत आहेत. त्यामुळे या परिसरात ढगांची चादर पसरली आहे. अरबी समुद्रातील पाण्याचे आणि भूगर्भातील जमिनीच्या बाष्पाचा हा एकत्रित परिणाम असल्याचेही ते म्हणाले.
रब्बी पिकांसाठी हा पाऊस फायद्याचा की तोट्याचा?
राज्यात खरीप काढण्यांना वेग आला असून अनेक भागात रब्बी पेरण्यांना सुरुवात झाली आहे. यंदा खरीप पिकांना जमिनीच्या कोरडेपणामुळे तसेच कमी झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाले. जमिनीतील ओल कमी झाल्याने पेरण्यांसाठी हा पाऊस उपयूक्त समजला जात असला तरी काढणीला आलेल्या पिकांना या पावसाचा मोठा फटका बसत आहे. कोरडवाहू पिकांना या पावसाचा फायदा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.