उजनी धरणातीलपाणीपातळी वरचेवर कमी होत असून, पाणीपातळी उणे ४२.७५ टक्क्यांपर्यंत पोचली. वाढते ऊन, बाष्पीभवनासह पाणीपुरवठ्याच्या योजना, यासाठी साधारण आठ दिवसाला धरणातील अंदाजे एक टीएमसी पाणी संपत आहे.
यंदा जिल्ह्यात खूपच कमी पाऊस झाला. धरणामध्ये तर जेमतेम ३५ टीएमसी इतकेच पाणी साठू शकले. पण नंतर पावसाने ओढ दिलीच, पण पाण्याचा उपसाही वाढल्याने, धरण यंदा लवकरच उणेमध्ये गेले.
शहरासाठी उजनीतून शुक्रवार, १० मे रोजी पाणी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज व चिंचपूर बंधाऱ्यात उजनीतून पाणी सोडण्याची मागणी सोलापूर महानगरपालिकेकडून करण्यात आली. तसे पत्र पालिकेने जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
त्यानंतर, जिल्हाधिकाऱ्यांनी १० मे रोजी उजनीतून साडे पाच टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. २० मे रोजी उजनीतील पाणी औज व चिंचपूर बंधाऱ्यात पोहोचेल. त्यानंतर शहरात सुरळीत पाणी पुरवठा होईल, असेही आशीर्वाद यांनी सांगितले.