राज्यात पावसाचे पुनरागमन झाले असून बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. मागील दोन दिवसात झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा वाढला असून आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.
आज मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात पिवळ्या इशाऱ्यासह तर काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याविषयी पुण्यातील हवामान विभागाचे के एस होसाळीकर यांनी ट्विट करूनही पावसाचा सुधारित अंदाज वर्तवला आहे.
14 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीत महाराष्ट्रसह मध्य भारतातील काही भागांमध्ये मान्सूनचा जोर वाढणार असून चांगला पाऊस होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. मान्सून पुढील दोन आठवडे सक्रिय राहण्याची शक्यता असून मध्य व उत्तर भारताच्या बहुतांश भागात पावसाची अपेक्षा आहे.
मान्सूनची आस असणारा कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे तसेच बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. त्यामुळे दक्षिण व मध्य महाराष्ट्रात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. पूर्व व मध्य बंगालच्या उपसागरात मंगळवार पर्यंत नव्याने चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होत असून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा 'यलो अलर्ट'?
आज राज्यात ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड उस्मानाबाद जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून विदर्भात चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा जिल्हा नाही पावसाचा पिवळा इशारा देण्यात आला आहे.