राज्यात पावसाने मागील तीन आठवड्यापासून हुलकावणी दिल्यानंतर आता विदर्भ आणि मराठवाड्यात काही जिल्ह्यात हलक्या सरींना सुरुवात झाली आहे. पुढील चार दिवस मराठवाडा आणि विदर्भातहवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून १८ ते २१ ऑगस्ट दरम्यान विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
आज रात्री आंध्रप्रदेश, तेलंगणा, छत्तिसगढ तसेच पूर्व विदर्भ, पश्चिम मध्यप्रदेश, खान्देशातील जळगाव येथे १०० मिमी च्या वर वादळी पाऊस होण्याची शक्यता असून वीज पडण्याची शक्यताही हवामान तज्ञांनी वर्तवली आहे.
मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांना पुढील दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून विदर्भात अकोला,अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांना पुढील चारही दिवस म्हणजेच २१ ऑगस्टपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्याच्या इतर भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची चिन्हे असून शनिवारी जळगाव, सांगली, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे तसेच ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठाही कमी झाला आहे. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना पिके जगवायची कशी अशी भीती वाटत होती. पण आता राज्यात पावसाला पोषक स्थिती तयार होत असल्याने दिलासादायक चित्र निर्माण होत आहे.
आज देशातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील या पावसामुळे सध्या लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत.दरम्यान,आजही हिमाचल,उत्तराखंडमध्ये अनेक ठिकाणी हलक्या ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान बंगालचा उपसागर आणि बांगलादेशावरील चक्रीवादळाचा दाब पुढील काही तासांत मजबूत होऊ शकतो, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे . यामुळे देशाच्या पूर्व आणि ईशान्य भागात पावसाचा जोर वाढू शकतो.