सोलापूर : परतीच्या पावसाने राज्याच्या काही भागात हजेरी लावली. आता सोलापुरात ही पावसाची एंट्री होणार आहे. हवामान विभागाने सोलापूरला मंगळवार १५ ऑक्टोबर रोजी यलो अलर्ट दिला आहे.
विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पाच ऑक्टोबर रोजी मोसमी पावसाने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.
हा परतीचा प्रवास अद्यापही सुरू आहे. परतीचा पाऊस ओडिसातील गोपाळपूर, छत्तीसगडमधील रायपूर, महाराष्ट्रातील काही भागातून जात आहे.
येत्या दोन दिवसांत संपूर्ण देशातून मान्सूनचा प्रवास सुरू आहे त्यामुळे सोलापुरातही मंगळवारी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पाऊस पडत आहे.
विजांच्या कडकडाटासह मराठवाडा आणि मध्य प्रदेशात वादळी पाऊस झाला. आता सोलापुरातही जोरदार पावसाचा अंदाज आहे.
हा पाऊस फक्त एक दिवस पडण्याची शक्यता असून बुधवार १६ ऑक्टोबर, गुरुवार १७ ऑक्टोबर व शुक्रवार १८ ऑक्टोबर रोजी पाऊस येण्याची शक्यता कमी असणार आहे.