कोपरगाव : शिर्डी शहरातील अतिक्रमणे काढण्यास विरोध करण्याच्या कारणावरून झालेल्या दंगलीच्या गुन्ह्यातील माजी आमदारासह १४९ आरोपींची शनिवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.२००४ साली नगरपंचायतीतर्फे शिर्डी शहरातील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. परंतू अतिक्रमण विरोधी पथकाकडून कारवाई सुरू असताना अतिक्रमण धारक व प्रशासन यांच्यात वाद निर्माण झाले. त्याचे पर्यावसान दंगलीत होऊन वातावरण तणावपूर्ण बनले. याप्रकरणी श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे, साई संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे, बाबुराव पुरोहित आदींसह एकूण १४९ आरोपींविरूध्द शिर्डी पोलीस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या खटल्याची सुनावणी न्यायालयात सुरू होती. सरकार पक्षातर्फे एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले. तत्कालीन पोलीस निरीक्षक व मुख्याधिका-यांसह तपासी अधिका-यांचे जबाब नोंदविण्यात आले. सरकार पक्षाच्या साक्षीदारांच्या पुराव्यातील विसंगती व परिस्थितीजन्य पुराव्यातील अभाव आरोपींच्या वकीलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. या प्रकरणातील बहुतांश आरोपी हे गरीब दुकानदार असून त्यांना खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आल्याने ते निर्दोष असल्याचा युक्तीवाद अॅड. जोशी यांनी केला. सरकार पक्ष व आरोपीतर्फे बचाव पक्षाचा युक्तीवाद होऊन अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.वाय. ए. के. शेख यांनी सदर गुन्ह्यातील सर्व १४९ आरोपींची निर्दोष मुक्तता केली. आरोपींतर्फे अॅड.आत्माराम जोशी, अॅड.जयंत जोशी, अॅड.एस.जे.जोशी, अॅड. व्ही.पी.खिस्ते, अॅड. एस.डी.भुजबळ यांनी काम पाहिले.
शिर्डी दंगलीतील १४९ आरोपींची निर्दोष मुक्तता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 7:34 PM