१९४ शाळा सुरू, इतर शाळांना परवानगी केव्हा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:21 AM2021-08-01T04:21:29+5:302021-08-01T04:21:29+5:30
कोरोनाची स्थिती काहीशी आटोक्यात आल्यानंतर कोरोनामुक्त गावांमध्ये शासनाने आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास मान्यता दिली. परंतु, शाळा सुरू ...
कोरोनाची स्थिती काहीशी आटोक्यात आल्यानंतर कोरोनामुक्त गावांमध्ये शासनाने आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास मान्यता दिली. परंतु, शाळा सुरू करताना शिक्षकांनी कोरोना चाचणी करणे अनिवार्य केले होते. जिल्ह्यात १५ जुलै रोजी शाळा सुरू झाल्या. दुसऱ्या दिवशी १६ जुलैला १४९ शाळा सुरू झाल्या. आता ३० जुलैअखेर जिल्ह्यात १९४ शाळा सुरू झाल्या असून, त्यात १६ हजार ८० विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
कोरोनामुक्त गावांत शाळा सुरू करताना पालकांची संमतीपत्रे आवश्यक आहेत. पालकांनी परवानगी दिली तरच अशा शाळा सुरू होऊ शकतात. जिल्ह्यात आठवी ते बारावी एकूण १२४२ शाळा आहेत. त्यात ८५ जिल्हा परिषदेच्या व ११५७ इतर व्यवस्थापन शाळांचा समावेश आहे. आतापर्यंत १९४ शाळा सुरू झाल्या असून, इतर गावांतील शाळा कधी सुरू होणार? त्यांना कधी परवानगी मिळणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
----------
आठवी ते बारावी एकूण शाळा - १२४२
सध्या सुरू असलेल्या शाळा - १९४
------------
तालुका सुरू असलेल्या शाळा
अकोले ४३
संगमनेर २७
कोपरगाव ४
राहाता ३३
राहुरी १०
श्रीरामपूर १६
नेवासा १४
शेवगाव १२
पाथर्डी ११
जामखेड ३
कर्जत ३
श्रीगोंदा ४
पारनेर ६
नगर ८
--------------
१९४
---------
कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढल्याने नेवासा तालुक्यातील एक व इतर दोन-तीन ठिकाणच्या शाळा सुरू होऊन पुन्हा बंद झाल्या. ती गावे पुन्हा कोरोनामुक्त झाल्यानंतर शाळा सुरू होतील.
----------------
विद्यार्थी मजेत, पालक चिंतेत
दीड वर्षांनंतर शाळा सुरू झाल्याने सर्व मित्र भेटले आहेत. ॲानलाईन शिक्षणापेक्षा वर्गातील शिक्षण चांगले आहे. त्यामुळे सर्व शाळा सुरू होणे गरजेचे आहे.
- आकाश साळुंके, विद्यार्थी
----------------
शाळा सुरू झाल्याने अभ्यासक्रमाची चांगली उजळणी होत आहे. शाळेत विद्यार्थी कोरोनाचे सर्व नियम पाळतात. एका बेंचवर एकच विद्यार्थी बसतो. त्यामुळे कोरोनाचा धोका नाही.
- रूद्र भालेकर, विद्यार्थी
--------------
कोरोनामुक्त गावांमध्ये शाळा भरल्या आहेत. परंतु, विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची बाधा होणार नाही, याची दक्षता शिक्षकांनी घेणे गरजेेचे आहे. विद्यार्थ्यांनीही अनावश्यक मित्रांसोबत फिरू नये. शाळेतून थेट घरी यावे. कोरोनाचे सर्व नियम पाळले तर शाळा सुरळीत सुरू होऊ शकतात.
- तुकाराम पांडुळे, पालक