हातगाव आरोग्य केंद्रात २ हजार १६९ जणांनी घेतली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:15 AM2021-04-29T04:15:34+5:302021-04-29T04:15:34+5:30
बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील हातगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवारपर्यंत (दि.२८) २ हजार १६९ नागरिकांनी लस घेतली आहे. कोरोनाचा वाढता ...
बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील हातगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवारपर्यंत (दि.२८) २ हजार १६९ नागरिकांनी लस घेतली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण गरजेचे आहे. याची विविध माध्यमातून जाणीव झाल्याने ग्रामीण भागातील नागरिक लसीकरणास सध्या उत्स्फूर्तपणे हजेरी लावत आहेत.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत हातगाव, बोधेगाव, बालमटाकळी, कांबी, लाडजळगाव, गायकवाड जळगाव, राणेगाव आदींसह २२ गावांचा समावेश आहे. येथील आरोग्य केंद्रात बुधवारपर्यंत हेल्थ केअर वर्कर, फ्रंट लाईन वर्कर, शिक्षक व ४५ वर्षे वय पूर्ण असणारे नागरिक आदी २ हजार १६९ नागरिकांना लस देण्यात आली आहे. सुरुवातीला लसीकरणासाठी नागरिकांचा प्रतिसाद अत्यल्प होता. मात्र, सध्या लस घेण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत. जिल्हास्तरावरून उपलब्ध लसीप्रमाणे उपस्थित नागरिकांना प्रथम टोकन दिले जाते. त्यानुसार नोंदणी करून लस देण्यात येते. परंतु पुरेशा लसींअभावी काहींना लस न घेता माघारी जावे लागते. याठिकाणी लसीकरणासाठी एक आरोग्यसेविका, एक आरोग्यसेवक, सामुदायिक आरोग्य अधिकारी व काही शिक्षक आदींची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांच्या माध्यमातून लसीकरण यशस्वीरित्या पूर्ण केले जात असल्याची माहिती येथील वैद्यकीय अधिकारी डाॅ. संदीप घुले यांनी दिली.