नियम तोडणाऱ्यांकडून २८ लाखांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:20 AM2021-04-21T04:20:55+5:302021-04-21T04:20:55+5:30
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत कोरोनाने भयानक स्वरूप धारण केले असून दिवसागणिक बाधितांचा आकडा वाढत आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही वाढले ...
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत कोरोनाने भयानक स्वरूप धारण केले असून दिवसागणिक बाधितांचा आकडा वाढत आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. कोरोनाग्रस्तांना हॉस्पिटलमध्ये जागा मिळेना, बेड मिळाले तरी ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शन मिळेना, अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत नियमांचे कडक पालन करत करोना विषाणूची साखळी तोडणे हाच पर्याय आहे. जिल्हाभरात नागरिक स्वयंस्फूर्तीने नियमांचे पालन करत असले तरी काही जण मात्र नियमांचे उल्लंघन करत स्वतःसह इतरांनाही धोका निर्माण करत आहेत. अशा बेफिकीर लोकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिले आहेत. नियमांच्या अंमलबजावणीसाठी नगर शहरासह जिल्हाभरात पोलिसांची २४ तास गस्त सुरू आहे. रस्त्यावर विनाकारण फिरणे, मास्क न लावणे, सोशल डिस्टन्सिंगचा नियम न पाळणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, नियम तोडून दुकाने उघडणे आदी स्वरूपाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येत असल्याचे जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी सांगितले.
..............
मागील चौदा दिवसांत अशी झाली कारवाई
विनामास्क फिरणे-
केस-४०१४
दंड- २० लाख ४ हजार १००
........
सोशल डिस्टन्सिंगचा नियम न पाळणे
केस-४१८
दंड-२ लाख ७२ हजार
.........
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे
केस-४२६
दंड-१ लाख २० हजार
............
६ हॉटेलवर कारवाई- दंड-२४ हजार
५१ दुकानदारांवर कारवाई- दंड ३८ हजार ५००
अकराशे ४१ वाहनचालकांवर कारवाई- दंड ३ लाख ६२ हजार १००
...........
पोलिसांच्या दंडुक्याशिवाय
समजतच नाही
नियमांचे पालन करा, असे प्रशासनाकडून वारंवार आवाहन केले जात असले तरी बहुतांश ठिकाणी अगदी शुल्लक कारणासाठी लोक घराबाहेर फिरताना पोलिसांना आढळून येत आहेत. ज्यांना अत्यावश्यक काम आहे त्यांच्यावर पोलिसांकडून कुठलीही स्वरूपाची कारवाई केली जात नाही. मात्र, घरात बसून कंटाळा आला होता, मित्राला भेटायला चाललोय, डॉक्टरांनी पायी फिरायला सांगितले होते, अशी कारणे काही लोक पोलिसांना सांगत आहेत. अशा लोकांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे.