भंगार नव्हे मरणच वेचतात ग्रामस्थ : खारेकर्जुने येथे 70 वर्षांत 400 ग्रामस्थांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 11:10 AM2019-07-11T11:10:00+5:302019-07-11T11:10:58+5:30
लष्कराच्या के़ के़ रेंज या युद्धसराव क्षेत्रात अनधिकृतरित्या बॉम्बचे सुटे भाग गोळा करताना स्फोट होऊन गेल्या सत्तर वर्षांत (स्थानिकांच्या माहितीनुसार) खारेकर्जुने (ता़ नगर) येथील ४०० ग्रामस्थांचा मृत्यू झाला
अरुण वाघमोडे / नवनाथ खराडे
अहमदनगर : लष्कराच्या के़ के़ रेंज या युद्धसराव क्षेत्रात अनधिकृतरित्या बॉम्बचे सुटे भाग गोळा करताना स्फोट होऊन गेल्या सत्तर वर्षांत (स्थानिकांच्या माहितीनुसार) खारेकर्जुने (ता़ नगर) येथील ४०० ग्रामस्थांचा मृत्यू झाला आहे तर १५ जणांना कायम स्वरुपीचे अपंगत्व आले आहे. बॉम्बमधून निघणारे पितळ, तांबे, जस्त, शिसे, लोखंड या धातूंना भंगारात चांगले पैसे मिळतात. याच पैशापायी आतापर्यंत अनेकांनी जीव गमावला आहे. या घटनांमधून पैशाची चटक लागलेले रहिवाशी काहीच धडा घेईनात. या कृत्यातून आपला जीव जाऊ शकतो हे माहीत असूनही अनेक जण युद्धसराव क्षेत्रात जाऊन स्वत:चे मरण वेचत आहेत.
खारेकर्जुने येथे युद्धसराव क्षेत्रात सापडलेल्या जिवंत बॉॅम्बमधून धातू काढताना मंगळवारी (दि. ९) अक्षय नवनाथ गायकवाड व संदीप भाऊसाहेब धिरोडे या तरुणांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षभरात येथे अशाच पद्धतीने पाच जणांनी जीव गमावला आहे.
नगर, राहुरी व पारनेर तालुक्यातील हजारो हेक्टर जमीन संपादित करून १९४० रोजी लष्करासाठी के. के. रेंज हे युद्धसराव क्षेत्र निश्चित करण्यात आले. या क्षेत्रात नगर तालुक्यातील खारेकर्जुने येथील शेतक-यांची १६०६ हेक्टर जमीन गेली. ४ हजार लोकसंख्या असलेले खारेकर्जुने हे गाव युद्धसराव क्षेत्रालगतच आहे. या गावात आतपर्यंत सरावक्षेत्राची रेंज निश्चित करण्यात आलेली आहे. या क्षेत्रात लष्कराचा वर्षभर सराव सुरू असतो. रणगाडे, हेलिकॉप्टर तर कधी विमानातून बॉम्बस्फोट करून सराव केला जातो. युद्धसरावादरम्यान वापरण्यात आलेल्या बॉम्बचे सुटे भाग सराव क्षेत्रात पडतात तर कधी बॉम्ब फुटत नाहीत त्यामुळे ते बॉम्ब जिवंत स्वरुपाचे असतात. २० ते २५ किलो वजनाच्या बॉम्बमध्ये चार ते पाच प्रकारचे धातू निघतात.
पितळ, तांबे, शिसे या धातूंना भंगारात चांगला भाव मिळतो. त्यामुळे येथील काही ग्रामस्थ अनधिकृतरित्या सराव क्षेत्रात प्रवेश करून बॉम्बगोळ्याचे तुकडे गोळा करून विकतात. कधी जिवंत बॉम्ब घरी आणून त्यातून धातू काढण्याचा प्रयत्न करतात. याचवेळी स्फोट होऊन जीव जातो.
युद्धसराव क्षेत्रातील दारुगोळ्याचे तुकडे गोळा करण्यासाठी लष्कराने १९९६ पासून ठेकेदार नेमलेला आहे. हे सुटे भाग गोळा करण्यास जाताना कामगारांना ओखळपत्र दिले जाते. क्षेत्र मोठे असल्याने कामगारांनाही सर्व सुटे भाग सापडत नाही. त्यामुळे ग्रामस्थ हे बॉम्बगोळे वेचून आणतात. हे भंगार गावातच काही जण खरेदी करतात.
या गावात देत नव्हते मुली
खारेकर्जुने येथे बॉम्बस्फोट होऊन बहुतांशी ग्रामस्थांचा मृत्यू झाल्याने या गावातील मुलांना लग्नासाठी मुली देण्यास नकार दिला जायचा. १९९६ पासून लष्कराने सरावक्षेत्रातील बॉम्बचे भंगार गोळा करण्यासाठी ठेकेदार नेमल्याने ग्रामस्थांचे भंगार गोळा करण्याचे प्रमाण कमी झाले. गावातील अनेकांनी हा व्यवसाय बंद केला. पैशांची मोहापायी मात्र आजही काही जण जीव धोक्यात घालतात.
कमी कष्टात जास्त पैसे
युद्धसराव क्षेत्रात दिवसभरात पाच ते सहा किलो बॉम्बगोळ्याचे सुटे भाग सापडले तर दीड ते दोन हजार रुपये मिळतात. त्यामुळे या गावातील काही तरुण दिवसभर लष्कराच्या हद्दीत भंगार शोधताना दिसतात.
सराव क्षेत्राला संरक्षक भिंत नाही
सराव क्षेत्र विस्तीर्ण असल्याने या क्षेत्राला संरक्षक भिंती बांधण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थ या क्षेत्रात सहज प्रवेश करतात. दिवसभर अनेक जण या ठिकाणी जनांवरे चारताना दिसतात. तर काही जण बॉम्बगोळे शोधण्यासाठी जातात.
खारेकर्जुने हे गाव युद्धसरावक्षेत्रानजिक आहे. त्यामुळे लष्कर अथवा शासनाने येथे संरक्षक भिंत बांधावी तसेच या परिसरातील भंगार गोळा करण्यासाठी ठेकेदाराची नेमणूक न करता सरकारी कर्मचा-यांनाच हे काम द्यावे. शासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष्य देऊन उपाययोजना कराव्यात. -अंबादास शेळके, ग्रामस्थ
युद्ध सराव क्षेत्रात ज्यांच्या जमिनी संपादित झालेल्या आहेत त्यांना आज रोजगार नाही. त्यामुळे काही जण पैशासाठी येथील भंगार गोळा करतात. शासनाने या गावातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. -बाळासाहेब ढवळे, ग्रामस्थ