अहमदनगर जिल्ह्यात आढळल्या ५७ हजार कुणबी नोंदी; समितीचे काम युद्धपातळीवर
By चंद्रकांत शेळके | Published: November 7, 2023 09:45 PM2023-11-07T21:45:29+5:302023-11-07T21:45:35+5:30
५२ हजार प्रमाणपत्र, तर ४ हजार दाखल्यांवरील नोंदी
अहमदनगर : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात मराठा कुणबी, कुणबी मराठा, तसेच कुणबी जातीचे पुरावे तपासणीची विशेष मोहीम युद्धपातळीवर सुरू झाली आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्षही कार्यान्वित करण्यात आला असून, तीन दिवसांत ५७ हजार नोंदी आढळल्या आहेत. यात जात पडताळणी समितीकडून दिलेले ५२ हजार ६७७ कुणबी प्रमाणपत्र आहेत, तर ४ हजार ११ नोंदी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला सापडल्या आहेत.
मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी मोहीम सुरू आहे. त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्त आणि सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्याबरोबर तालुकास्तरावर कक्ष स्थापून शोधमोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या अध्यक्षतेखाली कक्ष स्थापन केला असून, निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील या कक्षाचे सदस्य सचिव आहेत. या समितीमध्ये जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व सहायक आयुक्त (नगर पालिका प्रशासन), तालुकास्तरावर तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने दोन दिवसांत प्राथमिक शाळांमधील ११ लाख १४ हजार शाळा सोडल्याच्या रजिस्टरमधील नोंदी तपासल्या असून, यात ४ हजार ११ जणांच्या कुणबीच्या नोंदी आढळल्या आहेत. दुसरीकडे जात पडताळणी समितीकडून २१ नोव्हेंबर २०१६ पासून म्हणजे ही समिती जिल्ह्यात सुरू झाल्यापासून आजपर्यंत ५२ हजार ६७७ कुणबी दाखले वितरित केले आहेत. अशा प्रकारे जिल्हा प्रशासनाकडे आतापर्यंत ५६ हजार ६८८ जणांच्या कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदीची माहिती प्राप्त झाली आहे.
मोठ्या प्रमाणात नोंदी सापडण्याची शक्यता
जात पडताळणी समितीने आतापर्यंत ५२ हजार ६७७ कुणबी दाखले दिलेले आहेत. मात्र, इतर ठिकाणीही अजून बऱ्याच नोंदी सापडत आहेत. महसूल, पोलिस यंत्रणा, खरेदी-विक्री दस्तऐवज, नगर शहरातील वस्तुसंग्रहालय, जन्म-मृत्यूच्या नोंदीच्या, शाळेतील दाखल्यांचे रेकॉर्ड यांचा शोध संबंधित यंत्रणेकडून सुरू आहे. यात मोठ्या प्रमाणात कुणबी नोंदी सापडण्याची शक्यता आहे.