काळीज पिळवटून टाकणारी घटना: टेम्पोची आईला धडक, कडेवरच्या लेकराचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2024 09:16 AM2024-12-05T09:16:31+5:302024-12-05T09:20:52+5:30

पुणे रोडवरील घटना : चिमुकल्याला वाचवण्यासाठी आई-वडिलांची धावाधाव.

accident on nagar pune road Tempo Hits Mother Kid Dies on the spot | काळीज पिळवटून टाकणारी घटना: टेम्पोची आईला धडक, कडेवरच्या लेकराचा मृत्यू

काळीज पिळवटून टाकणारी घटना: टेम्पोची आईला धडक, कडेवरच्या लेकराचा मृत्यू

अहिल्यानगर : मद्यधुंद टेम्पो चालकाने हाताला जोराची धडक दिल्याने आईच्या कडेवर असलेल्या तीन वर्षांच्या लेकराचा रस्त्यावर पडून मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि. ३) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास नगर-पुणे रोडवरील केडगाव इंडस्ट्रीयल इस्टेट गेटसमोर झाला. स्वराज संभाजी महारनवर (वय ३, रा. मोहिनीनगर, केडगाव) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. संभाजी रामदास महारनवर (रा. मोहिनीनगर, केडगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. 

फिर्यादी रेल्वेस्टेशन येथे हमाली करत असून, त्यांच्या पत्नी केडगाव येथील कंपनीत काम करतात. नेहमीप्रमाणे फिर्यादीची पत्नी आपल्या तीन वर्षाच्या मुलाला घेऊन कंपनीत कामासाठी गेल्या होत्या. सायंकाळी सुटी झाल्याने त्या घरी जाण्यासाठी निघाल्या. रस्ता पार करण्यासाठी त्या नगर-पुणे रोडवरील केडगाव इंडस्ट्रीयल इस्टेट गेटसमोर येऊन थांबल्या. त्यावेळी स्वराज त्यांच्या कडेवर होता. त्याचवेळी पुण्याकडून अहिल्यानगरच्या दिशेने भरधाव वेगाने एक टेम्पो आला. या टेम्पोची फिर्यादीच्या पत्नीला जोराची धडक बसली. या धडकेत त्यांच्या कडेवर असलेला स्वराज रस्त्यावर पडला. त्यात तो गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे पुणे रोडवर एकच गर्दी जमली. नातेवाईकांनी स्वराज यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मयताच्या वडिलांनी चौकशी केली, तेव्हा टेम्पोचा चालक दारू पिलेला असल्याचे त्यांना सांगण्यात आले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

मद्यधुंद वाहन चालक सुसाट 

मद्यधुंद वाहन चालकाकडून धडक देण्याची ही दुसरी घटना आहे. शहरातील महात्मा फुले चौकात मद्यधुंद वाहन चालकाने दिलेल्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच पुणे रोडवर मद्यधुंद चालकाने धडक दिल्याने तीन वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे हा टेम्पो पुण्याकडून अहिल्यानगरकडे येत होता. केडगाव बायपास चौकात वाहनांची तपासणी करण्यासाठी चोवीस तास पोलिस तैनात असतात. तिथे मद्यधुंद वाहन चालकांचीही तपासणी करण्यात येते. तरीही मद्यधुंद टेम्पो चालक शहरात आला कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: accident on nagar pune road Tempo Hits Mother Kid Dies on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.