वाळूमाफिया किरण हजारेवर एमपीडीएतंर्गत कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 04:51 PM2018-06-30T16:51:59+5:302018-06-30T16:52:53+5:30
कोपरगाव तालुक्यातील कुख्यात गुंड व वाळूमाफिया किरण माधव हजारे (वय ३२) याच्यावर पोलीस व महसूल प्रशासनाने एमपीडीएतंर्गत कारवाई करत त्याला स्थानबद्ध केले आहे.
अहमदनगर : कोपरगाव तालुक्यातील कुख्यात गुंड व वाळूमाफिया किरण माधव हजारे (वय ३२) याच्यावर पोलीस व महसूल प्रशासनाने एमपीडीएतंर्गत कारवाई करत त्याला स्थानबद्ध केले आहे.
पोलीस प्रशासनाने १२ मे रोजी हजारे याच्यासह त्याच्या टोळीतील बारा जणांविरोधात मोक्कांतर्गत कारवाई करून त्यांना अटक केली होती. हजारे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्याच्यावर एमपीडीए (महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टी, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार कारवाई) अंतर्गत कारवाई करावी, असा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला होता. या प्रस्तावाला जिल्हाधिकारी यांनी शुक्रवारी मान्यता दिली. हजारे याच्यावर कोतवाली, कोपरगाव, शिर्डी, शिरूर आदी पोलीस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. हजारे याला स्थानबद्ध करण्याचे आदेश मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, सहायक निरीक्षक श्रीधर गुठ्ठे, सहायक फौजदार मधुकर शिंदे, कॉन्स्टेबल किरण हजारे, रवींद्र कर्डिले यांच्या पथकाने स्थानबद्ध केले. जिल्ह्यातील गुंड, वाळूमाफिया, अवैध दारू विकणारे अशा पाच गुंडांवर एमपीडीएतंर्गत कारवाई प्रस्तावित आहे.
गुन्हेगारांमध्ये घबराट
जिल्ह्यातील गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी धडक मोहीम हाती घेत मोक्का व एमपीडीएतंर्गत कारवाई सुरू केल्याने गुन्हेगारांमध्ये घबराट पसरली आहे. गुन्हेगार दत्तक योजनेतंर्गत जिल्ह्यातील व जिल्हाबाहेरील गुन्हेगारांची यादी तयार करून पोलीस अधिकाऱ्यांवर त्यांच्याकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे अनेक सराईत गुंड जिल्ह्यातून गायब झाले आहेत. या कारवाईत असेच सातत्य राहिले तर जिल्हा भयमुक्त होणार आहे.