शालेय साहित्य खरेदी सक्ती कराल तर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 03:55 PM2018-06-30T15:55:29+5:302018-06-30T15:55:35+5:30
शालेय साहित्य खरेदी सक्ती करणाऱ्या खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांवर कडक कारवाई करण्याचा आदेश जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या सभेत संबंधित अधिका-यांना शुक्रवारी देण्यात आला. तसेच पदवी शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याचे यावेळी ठरले.
अहमदनगर : शालेय साहित्य खरेदी सक्ती करणाऱ्या खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांवर कडक कारवाई करण्याचा आदेश जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या सभेत संबंधित अधिका-यांना शुक्रवारी देण्यात आला. तसेच पदवी शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याचे यावेळी ठरले.
जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा राजश्री घुले यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण समितीची सभा पार पडली. या सभेत इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून शालेय साहित्य खरेदीसाठी पालकांवर सक्ती केली जाते. शाळांनी निश्चित केलेला गणवेश, वह्या, पुस्तके विशिष्ट दुकानातूनच घ्यावेत, अशी सक्ती करण्यात येत आहे. तशा तक्रारी प्राप्त होत आहेत. परंतु, अशा शाळांवर कोणतीही कारवाई होत नसल्याची बाब भाजपाचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर सभापती घुले यांनी सर्व तालुक्यांतील इंग्रजी माध्यमांची शाळांची माहिती घेऊन कडक कारवाई करण्याचा आदेश दिला.
जिल्हा परिषदेच्या शाळांच्या धोकादायक इमारतींसाठी शिर्डी संस्थानने ३० कोटींच्या निधीस मान्यता दिली आहे. पहिल्या टप्प्यात १० कोटींचा निधी संस्थानकडून मिळणार आहे. निधी दिल्याबद्दल संस्थानच्या अभिनंदनाचा ठराव सभेत घेण्यात आला. कोणत्या शाळा खोल्यांचे काम प्राधान्याने करायचे, याचे अधिकार संस्थानने स्वत:कडे ठेवले आहेत. त्यावरही सभेत चर्चा झाली़ ज्या शाळा पर्यायी जागेत किंवा उघड्यावर भरतात, अशा शाळांना संस्थानने प्राधान्य द्यावे, अशी विनंती शिक्षण समितीकडून संस्थानकडे केली जाणार आहे़ तसा ठराव यावेळी घेण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या शाळांचा पट वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या. दोन शिक्षकी शाळांतील शिक्षकांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून निवड न करण्याची विनंती निवडणूक शाखेला करण्याचा ठरावही करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या शाळांना भौतिक सुविधा पुरविण्यासाठी अनेक संस्थांकडून मदत करण्यात येते.शाळांना आर्थिक मदत करणा-या संस्था व व्यक्तींना अभिनंदनाचे पत्र देण्याच्या सूचना घुले यांनी केल्या. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य राजेश परजणे, शिवाजी गाडे, उज्ज्वला ठुबे, मिलिंद कानवडे, राहुल झावरे आदींनी सहभाग घेतला.
इंग्रजीचे २२८५ विद्यार्थी जि.प. शाळेत
शहरासह ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. चालूवर्षी मात्र इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून २ हजार २८५ मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल झाली आहेत. ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.