जामखेड दुहेरी हत्याकांडानंतर पालकमंत्री राम शिंदे यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 10:57 AM2018-04-29T10:57:51+5:302018-04-29T11:00:13+5:30
जामखेड येथील दुहेरी हत्याकांडात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्यासह दोघांची हत्या झाली. त्या दोघांचे मृतदेह नगर येथील जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर तेथे आलेले पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना पाहून कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली
अहमदनगर : जामखेड येथील दुहेरी हत्याकांडात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्यासह दोघांची हत्या झाली. त्या दोघांचे मृतदेह नगर येथील जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर तेथे आलेले पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना पाहून कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे तणाव वाढला असून पोलिसांनी रुग्णालय परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
जामखेड ग्रामीण रुग्णालयातून दोन्ही मृतदेह नगरमधील एका खासगी रुग्णालयात आणण्यात आले. त्यावेळी तेथे मोठी गर्दी झाली होती. मृतदेहाची तपासणी करून ते जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्याची माहिती पालकमंत्री राम शिंदे यांना मिळताच तेही तिथे दाखल झाले. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात मोठा पोलीस फौजफाटा बोलविण्यात आला. पोलिसांनी चोहोबाजुंनी रुग्णालयाला घेराव घातला आणि सर्व दरवाजे बंद केले. त्यानंतर राम शिंदे यांनी प्रशिक्षणार्थी सहायक पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्याशी चर्चा केली. यावेळी शिवप्रहार संघटनेचे संजीव भोर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यानंतर पालकमंत्र्यांनी कार्यकर्त्यांचा रोष पाहता दवाखान्याच्या पाठीमागील दाराने काढता पाय घेतला.
जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, पोलीस उपाधिक्षक अरुण जगताप, पोलीस निरीक्षक माशाळकर, सुरेश सपकाळे, सहायक निरीक्षक विनोद चव्हाण यांच्यासह शंभराहुन अधिक पोलिसांचा बंदोबस्त होता. रात्री उशिरापर्यंत दोन्ही मृतदेह जिल्हा रुग्णालयातच होते. जामखेड येथील हत्याकांडाच्या घटनेने शहरात तणाव निर्माण झाला. कापडबाजारात काही तरुणांनी घुसून दुकाने, रस्त्यावरील हातगाड्या बंद करण्याचा प्रयत्न केला. जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, उपाधिक्षक सुदर्शन मुंडे यांनी रात्री घटनास्थळी भेट दिली.