अहमदनगर महावितरणला वादळी तडाखा, ११ खांब जमीनदोस्त, अनेक भागात अजूनही वीज नाही
By चंद्रकांत शेळके | Published: April 10, 2023 04:25 PM2023-04-10T16:25:10+5:302023-04-10T16:25:46+5:30
वादळात केवळ नगर शहरातीलच ११ खांब जमीनदोस्त झाले. शिवाय झाडे पडल्याने अनेक ठिकाणी वीजवाहिन्या तुटल्या.
अहमदनगर : शनिवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेतपिकांसह महावितरणलाही जोरदार झटका दिला. या वादळात केवळ नगर शहरातीलच ११ खांब जमीनदोस्त झाले. शिवाय झाडे पडल्याने अनेक ठिकाणी वीजवाहिन्या तुटल्या. महावितरण कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर दुरूस्तीचे काम हाती घेतल्याने रविवारी दुपारपर्यंत काही भागातील वीजपुरवठा सुरू झाला. मात्र काही भागातील वीज सोमवारी दुपारपर्यंतही आलेली नव्हती.
शनिवारी (दि. ८) सायंकाळी सात वाजल्यापासून जोरदार वादळी वाऱ्यासह गारांचा अवकाळी पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात वीज यंत्रणांचे नुकसान होऊन वीजपुरवठा खंडित झाला. अनेक ठिकाणी वीजवाहिनीवर झाडे पडली, कंडक्टर तुटले, तर काही ठिकाणी जम्प गेले. ग्रामीण उपविभाग व पारनेर तालुका अंतर्गत काही ११ केव्ही उच्च दाब वाहिन्या नादुरुस्त झाल्या होत्या. परंतु ग्रामीणच्या तुलनेत शहरात वादळी तडाखा अधिक बसला. त्यामुळे पूर्ण शहरासह सावेडी, केडगाव, दरेवाडी, भिंगार, एमआयडीसी या उपनगरांतही वीज खंडीत झाली. महावितरण कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. अंधार असल्याने व नुकसान मोठे असल्याने दुरुस्तीमध्ये अडथळे येत होते. रात्री तीन-चार वाजेपर्यंत दुरूस्तीचे काम सुरू होते. रविवारी सकाळपासूनच दुरूस्ती सुरू होती. त्यामुळे दुपारपर्यंत बहुतांश भागातील वीजपुरवठा सुरूळीत झाला.
परंतु सोमवारी सकाळी पुन्हा वीज खंडीत झाली. महावितरणने अनेक ठिकाणी रविवारी रात्री तात्पुरती दुरूस्ती केली होती. सोमवारी तेथे पुन्हा पक्की दुरूस्ती करण्यात येत असल्याने सोमवारी अनेक भागातील पुरवठा दिवसभर खंडित झालेला होता. दरम्यान वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. रात्री उकाड्याने, डासांनी नागरिक त्रस्त झाले.