मिलिंदकुमार साळवेअहमदनगर : यंदाच्या ऊस गळीत हंगामात साखरेच्या भावात सतत घसरगुंडी होत असल्याने साखर कारखाने आर्थिक अडचणीत असतानाही उसाचे पैसे अदा करण्यात कारखान्यांनी आघाडी घेतली आहे. अशाही परिस्थितीत १५ एप्रिलअखेर अहमदनगर विभागातील कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे ऊस बिलापोटी १६५ कोटी २७ लाख रूपये थकले आहेत.साखर आयुक्तालयाच्या अहमदनगर प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयांतर्गत अहमदनगरसोबतच नाशिक जिल्ह्याचाही समावेश आहे. १५ एप्रिलअखेर अहमदनगर जिल्ह्यातील ज्ञानेश्वर (नेवासा), पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे (प्रवरानगर),गणेश (राहाता), कर्मवीर शंकरराव काळे (कोपरगाव),मुळा (नेवासा),सहकारमहर्षी थोरात (संगमनेर),संजीवनी (कोपरगाव), सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे (श्रीगोंदा) या सहकारी साखर कारखान्यांनी एफ. आर. पी. नुसार ऊस तोडणी वाहतुकीचा खर्च वजा जाता शेतकºयांच्या ऊस खरेदीचे १०० टक्के पैसे अदा केले आहेत. याशिवाय अंबालिका, गंगामाई, श्री क्रांती शुगर या खासगी कारखान्यांनी देखील ऊस तोडणी वाहतूक खर्च वजा जाता रकमा शेतकºयांच्या खात्यात वर्ग केल्या आहेत.अगस्ती कारखान्याने ९०.१० टक्के, अशोक कारखान्याने ९१.०१ टक्के, वृद्धेश्वर कारखान्याने ९०.७५, कुकडी कारखान्याने ७८.७२, केदारेश्वर कारखान्याने ५३.९७, राहुरीच्या तनपुरे कारखान्याने ४५.४३, पियुष या खासगी कारखान्याने ६६.५१ टक्के, प्रसाद शुगरने ८२.१४, जय श्रीराम खासगी कारखान्याने ९५.६९,देवठाणच्या साईकृपा खासगी कारखान्याने ९८.३० तर पहिलाच गळीत हंगाम पार पाडलेल्या संगमनेरच्या युटेक शुगरने ५२.७५ टक्के पेमेंट शेतकºयांना अदा केले आहे.नाशिक जिल्ह्यातील कादवा, द्वारकाधीश व के. जी. एस. या तीन कारखान्यांनी १०० टक्के पैसे अदा केले आहेत. दोन्ही जिल्ह्यातील २७ कारखान्यांनी यंदाच्या हंगामात ऊस गाळप केले. दोन जिल्ह्यातील शंभर टक्के पैसे अदा न करणाºया कारखान्यांनी १५ एप्रिलपर्यंत १६५ कोटी २७ लाख रूपये ऊस बिलाची रक्कम थकविली आहे. ऊस तोडणी वाहतूक खर्च वजा जाता २७ कारखान्यांनी गाळप केलेल्या उसाच्या बिलाची रक्कम २ हजार ६४२ कोटी ७६ लाख रूपये झाली आहे.हंगामाच्या सुरूवातीस साडेतीन हजार रूपये प्रति टन भावाची मागणी शेतकरी संघटनांकडून झाली. नंतर साखरेच्या दरातील घसरणीमुळे कारखान्यांनी ऊस दर देण्यात हात आखडता घेतला. सर्वाधिक २३०० रूपये भाव देणारा मुळा कारखाना जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे. नाशिकमध्ये द्वारकाधीश,केजीएसनेही २३०० रूपये भाव दिला आहे.