अहमदनगर जिल्हा परिषद पदभरतीला ५४६ जणांची दांडी
By चंद्रकांत शेळके | Published: November 1, 2023 07:44 PM2023-11-01T19:44:48+5:302023-11-01T19:46:38+5:30
Ahmednagar : जिल्हा परिषदेच्या वर्ग तीनच्या सरळसेवा पदभरतीसाठी गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या परीक्षेत आतापर्यंत १४ संवर्गातील पदांसाठी एकूण ३१५५ उमेदवारांनी नोंदणी केली होती.
- चंद्रकांत शेळके
अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या वर्ग तीनच्या सरळसेवा पदभरतीसाठी गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या परीक्षेत आतापर्यंत १४ संवर्गातील पदांसाठी एकूण ३१५५ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यातील ५४६ उमेदवार प्रत्यक्ष परीक्षेला गैरहजर राहिले, तर २६०९ उमेदवारांनी परीक्षा दिली.
जिल्हा परिषदेच्या वर्ग ३मधील पदभरतीसाठी सध्या राज्यभर परीक्षा सुरू आहेत. यातील पहिल्या दोन टप्प्यात दि. ७ ते १७ ॲाक्टोबर या कालावधीत १४ संवर्गातील पदांसाठी परीक्षा झालेली आहे. या पदांसाठी ३१५५ उमेदवार परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. परंतु त्यातील ५४६ जणांनी परीक्षेला दांडी मारली.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या या पदभरतीची परीक्षा सुरू झाल्यापासून अनेक अडथळे येत आहेत. अनेकदा या परीक्षेचे वेळापत्रक पुढे ढकलले. आता १४ दिवसांच्या खंडानंतर दुसऱ्या टप्प्यातील तीन दिवसांचे वेळापत्रक जाहीर झाले असून यात १ नोव्हेंबर रोजी जुनिअर मेकॅनिक, मेकॅनिक व कनिष्ठ आरेखक असे पेपर झाले. आता दि. २ नोव्हेंबर रोजी विस्तार अधिकारी (शिक्षण), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तर ६ नोव्हेंबर रोजी विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) असे पेपर होणार आहेत.
दरम्यान, ६ नोव्हेंबरनंतरचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. १२ नोव्हेंबरला दिवाळी आहे. त्यामुळे उर्वरित पदांची परीक्षा आता दिवाळीनंतरच होईल, अशी शक्यता आहे. कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्य सेवक (महिला, पुरूष), कनिष्ठ सहायक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, मुख्य सेविका, कनिष्ठ अभियंता (ग्रामीण पाणीपुरवठा), औषध निर्माण अधिकारी या पदांसाठीची परीक्षा अजून बाकी आहे.