ढवळगाव : अनेकांचे श्रद्धास्थान असणारे राजस्थानमधील श्री क्षेत्र अजमेर, पुष्कर येथे जाण्यासाठी जिल्ह्यातील भाविकांना सोयीस्कर व्हावे यासाठी अहमदनगर मार्गे रेल्वे सेवा सुरू करावी, अशी मागणी भाविकांनी केली आहे. बंगळुरू-सोलापूर-अहमदनगर मार्गे-जयपूर (अजमेर) अशी ही रेल्वे सेवा असावी, अशी मागणी होत आहे. यामुळे पर्यटन वाढीसही मदत होणार आहे.
सध्या अजमेर व पुष्करला जाण्यासाठी यशवंतपूर (बंगळुरू) ते जयपूर अशी सुविधा एक्स्प्रेस (क्र.८२६५३) आहे. त्या रेल्वेने जाण्यासाठी नगर जिल्ह्यातील भाविकांना थेट पुणे येथे जावे लागते. किमान या गाडीला दौंड जंक्शन येथे थांबा झाल्यास परिसरातील भाविकांची गैरसोय दूर होईल. मात्र तसे काहीच होत नाही. याशिवाय अहमदनगर मार्गे अजमेर, पुष्कर येथे जाण्यासाठी आठवडाभरातून किमान एखादी रेल्वे सुरू व्हावी. जिल्ह्यातील श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, पारनेर, श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव, पाथर्डी आदी तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने अजमेर व पुष्कर येथे जातात.
अजमेर येथे ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा दर्गा, तर श्री क्षेत्र पुष्कर येथे ब्रम्हाजींचे मंदिर आहे. त्यामुळे येथे दक्षिण भारतातूनही भाविक जातात. अनेक तीर्थ क्षेत्रांना जोडणारा हा मार्ग आहे. साईबाबांची शिर्डी, पंढरपूर, तुळजापूर, गाणगापूर, अक्कलकोट, गुलबर्गा अशी तीर्थक्षेत्र बंगळुरू-जयपूर मार्गावर येतात. त्यामुळे जयपूरला जाण्यासाठी बंगळुरू-सोलापूर-अहमदनगर मार्गे-जयपूर अशी रेल्वे सुरू व्हावी अशी मागणी भाविकांमधून होत आहे.
---
जयपूरला जाण्यासाठी अहमदनगर येथून रेल्वे सुरू झाल्यास आर्थिक, शारीरिक, मानसिक त्रास कमी होईल. आणखी मोठ्या संख्येने भाविक जयपूरला जातील.
-अब्दुल सय्यद, यासिन शेख,
भाविक
---
अजमेर, पुष्कर देवस्थान, पर्यटन दृष्ट्या गुलाबी शहर म्हणून ओळख असणारे जयपूर, वाळवंटाची सफर करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. परंतु, अहमदनगर येथून रेल्वे नसल्यामुळे अनेकांच्या स्वप्नावर पाणी पडते. प्रवाशांची अडचण दूर होण्यासाठी मदत होईल. याबाबत लवकरच प्रवासी संघटना, खासदारांना निवेदन देण्यात येईल.
-संदीप भोसले,
प्रवासी