पक्षातील गटातटात हरवले अकोलेतील नेते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:22 AM2021-07-31T04:22:11+5:302021-07-31T04:22:11+5:30
अकोले : तालुक्यात सध्या राजकीय दोलायमान वातावरण निर्माण झाले आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षातील अंतर्गत धुसफूस सुरू आहे. ...
अकोले : तालुक्यात सध्या राजकीय दोलायमान वातावरण निर्माण झाले आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षातील अंतर्गत धुसफूस सुरू आहे. गट-तट प्रबळ होत असल्याने तालुक्यातील सर्वच पक्षामध्ये सध्या अस्थिरता दिसू लागली आहे. पक्षाअंतर्गत गटातटात अकोले तालुक्यातील नेते हरवल्याचे चित्र सद्य:स्थितीत दिसत आहे.
कोरोना सावट कमी होताच तालुक्यातील पक्षांतर्गत झाकलेली मूठ उघडत आहे. आपल्याच नेत्यांवर नाराजी व्यक्त करत पक्ष बदल सुरू झाले आहेत. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर गतवेळी भाजपला राम राम करत पिचडांचे कट्टर समर्थक मीनानाथ पांडे, शेतकरी नेते मधुकर नवले व मदन पावे राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले. जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध होताच सीताराम गायकर व समर्थकांनी भाजपमधून राष्ट्रवादीत घरवापसी केली. तर राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी संगमनेरात काँग्रेस पक्षात प्रवेश केला. गत आठवड्यात राष्ट्रवादीच्या दोन आदिवासी आमदार नेत्यांनी माजी मंत्री पिचड यांची भेट घेतली. यापूर्वी तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी पिचड यांना भेटले. पिचड पिता-पुत्र स्वगृही परतणार की काँग्रेसमध्ये दाखल होणार? याबाबत वावड्या उठू लागल्या आहेत.
लोकसभेत अकोले तालुक्यातून काँग्रेसला ३२ हजार अधिक मते मिळाली होती. तरी पिचड पिता-पुत्रांनी विधानसभेला हाती कमळ घेतले, ही बाब तालुक्यातील जनतेला रुचली नाही. विधानसभा राष्ट्रवादीने शाबूत ठेवली मात्र राज्यातील नेत्यांना तालुक्यातील पक्षांतर्गत कुरघोडीला पायबंद घालण्यात अद्याप यश लाभलेले नाही. राष्ट्रवादीत दोन-तीन गट उघड दिसतात तसे भाजप, काँग्रेसमध्येही गटतट असल्याचे लपून राहिलेले नाही. भविष्यातील सहकारी संस्था, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्ष बदल व पक्षांतर्गत कुरघोड्या वाढल्याचे चित्र आहे. प्रत्येकाला मोठे होण्याची घाई झाल्याने तालुक्यातील राजकीय पटलावर गोंधळाचे वातावरण तयार झाले आहे. विधानसभेच्या निवडणुका फार दूर आहेत तरी आमदार होण्याची स्वप्ने अनेकांना पडू लागली आहेत. राष्ट्रवादीतून निवडून गेलेला जिल्हा परिषद सदस्य भाजपच्या गोटात सक्रिय आहे तर भाजपचे राष्ट्रवादीत सामील झालेत. काही जिल्हा परिषद सदस्यांचा एकला चलो रे ! असा हेका सुरू आहे. यातून पक्षांतर्गत दुफळी चव्हाट्यावर आली आहे.
विद्यमान आमदार एकटेच दौरे करतात. पदाधिकारी यांना फार जवळ करत नाहीत, असा सुरू आळवत त्यांच्या विरोधात पक्षातील एक गट सोशल मीडियातून सक्रिय आहेत. ओबीसी आंदोलनात माजी आमदार उपस्थित नव्हते म्हणून भाजप गट नेत्याने उघड नाराजी व्यक्त केली होती. शिवसेनेतही गटतट असून, विधानसभा निवडणुकीतच हे गट जनतेने पाहिले आहे. तालुक्यातील दोन शेतकरी संघटना सक्रिय आहेत. आरपीआयचे गट आहेत. भाकप व माकपचे मात्र गट नाहीत. त्यांची स्वतंत्र संघटना स्वतंत्र आंदोलने असतात.
..............
काम करणाऱ्याला पक्षात स्थान, पद, प्रतिष्ठा मिळते. काहींनी पद घेतली; पण काम केले नाही. ते निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्ष सोडून गेले. घर प्रपंच सांभाळून तरुणांनी राजकारणात सक्रिय असावे. योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्ते बरोबर घेऊन काम सुरू आहे.
- आमदार डाॅ. किरण लहामटे
..........
माजी मंत्री बावनकुळे यांचा युवा संघटन वाढीसाठीचा दौरा होता. पिचड पिता-पुत्र यांच्या घरवापसी वा काँग्रेस पक्ष प्रवेश या केवळ वावड्या आहेत. त्यात तथ्य नाही. तालुक्यातील माजी मंत्री व माजी आमदार भाजप पक्ष सोडणार नाहीत.
- सीताराम भांगरे, तालुकाध्यक्ष, भाजप