अळकुटी, कळस, रांधे, दरोडीचा कांदा लंडनला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 12:34 PM2020-05-08T12:34:48+5:302020-05-08T12:36:01+5:30
कोरोनामुळे सध्या सर्वत्र लॉकडाउन असल्याने शेतक-याची कांदा विक्रीची मोठी अडचण झाली आहे. पारनेर येथील प्रसन्ना कृषी उद्योग समुहाने शेतक-यांचा कांदा विक्रीसाठी पुढाकार घेतला आहे. शेतकºयांचा कांदा जास्त भावाने खरेदी करून समुद्रमार्गे थेट लंडनला पाठविण्याचे काम सुरू केले आहे.
अळकुटी : कोरोनामुळे सध्या सर्वत्र लॉकडाउन असल्याने शेतक-याची कांदा विक्रीची मोठी अडचण झाली आहे. पारनेर येथील प्रसन्ना कृषी उद्योग समुहाने शेतक-यांचा कांदा विक्रीसाठी पुढाकार घेतला आहे. शेतक-यांचा कांदा जास्त भावाने खरेदी करून समुद्रमार्गे थेट लंडनला पाठविण्याचे काम सुरू केले आहे.
शेतक-यांच्या सोयीसाठी उद्योजक किरण डेरे, विकास गांधी यांनी खासगी कांदा मार्केट सुरू केले. गेल्या पाच वर्षांपासून मार्केटच्या माध्यमातून ते शेतक-यांच्या मालाला योग्य भाव देत आहेत. मार्केटपेक्षा दोन ते तीन रुपये किलोमागे कांद्याला जास्त भाव दिला आहे. थेट शेतावर जाऊन कांदा खरेदी केला जात आहे. शेतकºयांकडून गोणी, मजुरी, तोलाई, मापाई, हमालीचे पैसे घेतले जात नाहीत. रांधे, दरोडी, कळस, पाडळी आळे, गारखिंडी, अळकुटी परिसरातील गावांमधून कांदा खरेदी करण्यात येतो. कंटेनरमध्ये २५ टन कांदा मजुरांमार्फत भरला जातो. मुंबईत गेल्यानंतर जहाजामधून हा कांदा लंडनकडे रवाना करण्यात येतो.
बांधावर जाऊन कांदा खरेदी होत आहे. जास्त भाव दिल्याने शेतकरी समाधानी आहेत. कांद्याचा कंटेनर पोहचायला २७ दिवस लागतात. दर आठ दिवसांनी २५ टन कांदा येथून भरण्यात येतो. कांद्याचे अडीच किलोचे पॅकेट तयार करून पाठविले जातात, असे प्रसन्ना कृषी उद्योग समुहाचे संचालक किरण डेरे यांनी सांगितले.
आम्ही पाच वर्षांपासून प्रसन्ना कृषी उद्योग समूहामधून शेतक-यांच्या कांद्याला योग्य भाव देत आहोत. आताही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कांदा शेताच्या बांधावर जाऊन खरेदी करत आहोत. यामुळे शेतक-यांनाही कांद्याला चांगला भाव मिळत आहे, असे कळस येथील शेतकरी सुभाष गलांडे यांनी सांगितले.