भेटीगाठीसोबतच मदतही आटली ; वृद्धाश्रमात आजी-आजोबा एकाकी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:20 AM2021-04-21T04:20:50+5:302021-04-21T04:20:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : जबाबदारी म्हणून मुलाबाळांना लहानाचे मोठे करून स्वताच्या पायावर उभे राहावे,यासाठी उभे आयुष्य काबाडकष्ट करून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : जबाबदारी म्हणून मुलाबाळांना लहानाचे मोठे करून स्वताच्या पायावर उभे राहावे,यासाठी उभे आयुष्य काबाडकष्ट करून धडपड केली. जेणेकरून हेच मुले हातपाय थकल्यानंतर म्हातारपणात आपला सांभाळ करतील. मात्र, तसे न होता नियतीने ऐन म्हातारपणात केलेल्या क्रूर चेष्टेमुळे अशा शेकडो आजी- आजोबांना वृद्धाश्रमात राहण्याची वेळ आली आहे. त्यातच आश्रमात दिवस काढताना भेटीगाठीसाठी येणाऱ्यांकडून मदत ही होत आणि गप्पागोष्टी करून मन देखील रमतं ; परंतु, कोरोनामुळे गेल्या वर्षभरात भेटीगाठी सोबतच मदतही आटली असून वृद्धाश्रमात आजी-आजोबा एकाकी पडल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
राहाता तालुक्यातील शिर्डी येथे बी. श्रीनिवास यांच्या संकल्पनेतून द्वारकामाई वृद्धाश्रम हे गेली अनेक वर्ष शेकडो वृद्ध आजी-आजोबांचा सांभाळ करीत आहेत. या आश्रमाच्या माध्यमातून आजी- आजोबांना सर्वच प्रकारची सेवा निशुल्क देत आहेत. त्यामध्ये सर्वांची स्वतंत्र राहण्याची सोय, दाम्पत्य असतील तर त्यांची वेगळी व्यवस्था, दोन्ही वेळचे जेवण, चहा, नाष्टा, सर्वच प्रकारचे कपडे, दवाखाना, गोळ्या औषध यासह इतरही सर्व निशुल्क केले जाते. या आश्रमात जवळपास २५ पेक्षा जास्त कर्मचारी वृद्धांच्या सेवेसाठी हजर आहेत. आश्रम व्यवस्थेकडून आजही त्यांना कोणत्याच प्रकारची कमतरता भासू दिली जात नाही.
साईबाबांमुळे शिर्डी हे जागतिक दर्जाचे धार्मिकस्थळ असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून देशासह विदेशातून अनेक भाविकभक्त दर्शनासाठी शिर्डीत येतात. तसेच दानधर्म देखील करीत असतात. त्यामुळे असे दानशूर भाविक शिर्डीत आल्यानंतर द्वारकामाई वृद्धाश्रमास भेट देत आणि येथील वृद्ध आजी-आजोबांना कपडे, मिठाई, आर्थिक मदत, भेट वस्तू देऊन दिवसेंदिवस गप्पा मारीत. यामध्ये या आजी- आजोबांचा विरंगुळा होत असे. त्यातून त्यांचा वेळही जात असे. परंतु गेल्या वर्षापासून वैश्विक कोरोना महामारीपासून शिर्डीतील साईमंदिर अनेक महिने दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे भाविकांना शिर्डीत येणे कठीण झाल्याने आश्रमात व्यक्तीश: आजी - आजोबांना होणारी मदत आटली. त्यातच सर्व वयोवृद्ध असल्याने त्यांची सुरक्षा म्हणून देखील आश्रम व्यवस्थापनाने गेल्या वर्षापासून बाहेरच्या लोकांना आश्रमात येण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे येथील आजी- आजोबा एकमेकांत गप्पा मारून, देवाची पूजा, नाम जप करून दिवस घालवत आहेत.
....................
वृद्धाश्रमातील एकूण सदस्य - १३०
स्त्री - ७७
पुरूष - ५३
..............
भेट देणारे शून्यावर...
वृद्धाश्रमाला महिन्याला साधारण १०० पेक्षा जास्त विविध प्रकारच्या व्यक्ती भेट देऊन आजी - आजोबांशी गप्पा मारीत, त्यांना व्यक्तीश: मदत करीत ; परंतु कोरोना आल्यापासून भेट देणाऱ्यांची संख्या ही शून्यावर आली आहे.
..........
मदतही आटली ...
वृद्धाश्रम व्यवस्थापनाकडून आश्रमातील आजही कोणत्याच प्रकारची कमी नाही. त्यांची सर्वच व्यवस्था चोखपणे ठेवली जात असून त्यांच्या सर्व गरजा साईबाबांच्या कृपेने आजही पूर्ण होत आहे. मात्र, आश्रमाला भेट देण्यासाठी आलेल्या व्यक्तीकडून जी व्यक्तीश: मदत होत होती. ती सध्या बंद झाली आहे. कारण सर्वच वृद्ध असल्याने त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बाहेरील लोकांच्या भेटी बंद केल्या आहेत.
- बी. श्रीनिवास, कार्यकारी विश्वस्त, द्वारकामाई वृद्धाश्रम, शिर्डी.
................
आश्रम व्यवस्थापन आमची आजही खूप काळजी घेते. पूर्वी खूप लोक आश्रमाला भेट देत, त्यामुळे त्यांच्या समवेत गप्पागोष्टी करून दिवस कसा निघून जायचा हे समजत देखील नव्हते. परंतु, गेल्यावर्षीपासून आश्रमात बाहेरून येणारे लोक बंद झाले. त्यामुळे सध्या आम्ही सर्वच म्हातारे एकत्र बसून गप्पा मारून दिवस काढत आहोत.
- ६१ वर्षीय आजोबा.
............
मी दररोज सकाळची सुरुवात देवाच्या पूजेने करते. दिवसभर जमेल तसा नामजप करीत असते. दुपारी काहीवेळ विश्रांती घेऊन त्यानंतर उर्वरित वेळेत सर्वच गप्पा मारत बसतो.
- ७० वर्षीय आजी.
.............
आम्ही दाम्पत्य आहोत त्यामुळे आमच्यासाठी स्वतंत्र खोली आहे. दिवसभर जमेल तसे देवाचे नामस्मरण करतो, एकमेकांत गप्पा मारत बसतो. त्यातच आयुष्यातील एखादा प्रसंग अथवा घटना समोर आलीच, तर त्याच्या चर्चेत कसा दिवस निघून जातो हे कळतच नाही. यात आम्ही भावुक होऊन जातो. मात्र, आश्रमाचे चालक श्रीनिवास भाऊ आमची आई- वडिलांप्रमाणेच सेवा करतात.
- वयोवृद्ध आजी- आजोबा, दाम्पत्य.
....................