राहाता : राहाता येथील भन्साळी होंडा शोरुममधून घेतलेल्या गाडीचे इंजिन बदलून न दिल्याचा राग आल्याने संतप्त युवकाने शोरुमसमोरच नगर-मनमाड महामार्गावर मोटारसायकल उभी करुन पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना आज घडली.प्रमोद सुदाम निर्मळ (वय २७, रा.पुणतांबा) या युवकाने दोन महिन्यापूर्वी राहाता येथील भन्साळी होंडा शोरुममधून होंडा कंपनीची मोटारसायकल रोख रक्कम भरुन घेतली होती. या गाडीचे पासिंग होऊन गाडीला एम.एच.-१७, सी.एफ.-९५६८ गाडी नंबर मिळाला होता. दरम्यानच्या काळात गाडीच्या इंजिनमधून आवाज येत असल्याने या युवकाने चार वेळा शोरुममध्ये येऊन गाडीचे काम करुन नेल्यानंतरही इंजीनमधून आवाज येत होता. या युवकाने या गाडीचे इंजिन बदलून द्या, अशी मागणी केली. मात्र त्यास शोरुम व्यवस्थापकाने प्रतिसाद न दिल्याने या युवकाला राग अनावर झाला. प्रमोदने बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घेतलेली गाडी शोरुम समोरील नगर-मनमाड रोडवर गाडी उभी करुन पेट्रोल टाकून पेटवून दिली. या घटनेनंतर या परिसरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी जमा केली होती. राहाता नगरपरिषदेच्या अग्निशामक बंबाच्या साह्याने आग विझविण्यात आली. तोपर्यत मोटारसायकल पूर्णपणे खाक झाली होती.मी गाडी घेतल्यापासून चार वेळा गाडी दुरुस्त करुन नेली. तरीही इंजिनमधला आवाज बंद होत नव्हता. याबाबत शोरुम व्यवस्थापनाने मला उडवाउडवीचे उत्तरे दिली गेल्याने मला मनस्ताप झाल्याने मी गाडी पेटवून दिली. -प्रमोद सुदाम निर्मळ, गाडी मालक.या गाडीच्या संदर्भात शनिवारी तक्रार आली होती. त्यानंतर गाडीचे काम करुन दिले होते. इंजिनमध्ये आवाज येत असल्याने इंजिन बदलून द्या, अशी मागणी केली होती. मात्र लगेच बदलून देता येणार नाही. तक्रार देऊन रिपोर्ट पाठवावा लागतो, असे या ग्राहकाला सागण्यात आले होते. -सिध्दार्थ भन्साळी, होन्डा शोरुम मालक.
संतप्त युवकाने शोरूम समोरच मोटारसायकल पेटविली : राहात्यामधील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 5:11 PM