दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ अण्णा हजारे करणार एक दिवसाचे उपोषण
By | Published: December 8, 2020 04:18 AM2020-12-08T04:18:45+5:302020-12-08T04:18:45+5:30
पारनेर (जि. अहमदनगर) : दिल्लीचे शेतकरी आंदोलन आणि भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे मंगळवारी (दि.८) ...
पारनेर (जि. अहमदनगर) : दिल्लीचे शेतकरी आंदोलन आणि भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे मंगळवारी (दि.८) राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथील पद्मावती मंदिरात एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
शेतकऱ्यांनी दिल्ली येथे सुरू केलेल्या आंदोलनाला अण्णा हजारे यांनी यापूर्वीच पाठिंबा दिला आहे. हजारे म्हणाले, कृषिमूल्य आयोगाला सरकारने स्वायत्तता द्यायला हवी, अशी आमची मागणी आहे. स्वामिनाथन आयोगाच्या अहवालानुसार पिकांना उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के जादा भाव द्यायला पाहिजे. ही मागणी मोदी सरकारने यापूर्वीच मान्य केली होती. २३ मार्च २०१८ ला लिखित आश्वासन दिले होते. मात्र, त्यावर अंमलबजावणी करण्यात आली नाही.
याबाबत सतत पत्रव्यवहार करीत राहिलो. मात्र, आश्वासन पाळण्यात आले नाही. त्यानंतर मी सात दिवस उपोषण केले. कृषिमंत्र्यांनी तेव्हाही लिखित आश्वासन दिले होते. कृषिमूल्य आयोगाला स्वायत्तता देण्याविषयी समिती बनविण्यात येईल. ३० ऑक्टोबर २०१९ ला समितीचा अहवाल येईल. त्यानंतर कार्यवाही करू. पंतप्रधान आणि दोन कृषिमंत्र्यांनी लिखित आश्वासन दिल्यानंतरही स्वामिनाथन आयोगानुसार शेतमालाला भाव आणि कृषिमूल्य आयोगाला स्वायत्तता मिळाली नाही, अशी खंत हजारे यांनी व्यक्त केली.
शेतकरी आंदोलनात हिंसा नाही. अहिंसेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे. सरकारने पाच वेळा बैठका घेऊनही मागण्या मान्य केल्या नाहीत. नाक दाबल्यानंतरच सरकारचे तोंड उघडेल, त्यामुळे देशभरातल्या सर्व शेतकऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यायला हवा, असे आवाहन हजारे यांनी केले.